अमरावती: वन विभागाच्या अमरावती प्रादेशिकचे वादग्रस्त उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्याविरोधात एका महिला आरएफओंनी गंभीर स्वरूपाची तक्रार दिल्यानंतर मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी पाच सदस्यी चौकशी समितीचे गठन केले आहे. यात तीन महिला उपवनसंरक्षक, एक सहायक वनसंरक्षक तर एका पुरूष आरएफओंचा समावेश आहे.
मुख्य वनसंरक्षक बॅनर्जी यांच्याकडे १० फेब्रुवारी २०२४ रोजी वडाळीच्या महिला आरएफओ यांनी लेखी तक्रारीद्वारे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्याविषयी गंभीर आरोप केले आहे. या आरोपांची शहानिशा आणि वास्तव जाणून घेण्यासाठी सीसीएफ बॅनर्जी यांनी १४ फेब्रुवारी राेजी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्याभारती एम. या आहेत. तर सदस्य म्हणून बुलडाणा प्रादेशिकच्या उपवनसंरक्षक सरोज गवस, चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाडे, सिपना वन्यजीव विभाग परतवाड्याच्या सहायक वनसंरक्षक प्रतीक्षा काळे आणि सदस्य सचिव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे (दस्तऐवज अधिकारी) आरएफओ योगेश तापस यांचा समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणी समितीला सखोल चौकशी करून चौकशी अहवालासह स्वयंस्पष्ट अभिप्राय २६ फेब्रुवारीपर्यंत मुख्य वनसंरक्षकांकडे सादर करावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. आमदार बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
आमदार बच्चू कडू यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविलेल्या पत्राद्वारे अमरावती प्रादेशिकचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. माझ्या मतदार संघातील लोकहिताची कामे मार्गी लागत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या कोणत्याही बैठकीला मिश्रा उपस्थित राहत नाही, लोकप्रतिनिधींचे भ्रमणध्वनी घेत नाही.नियमानुसार कामे झाली असताना कंत्राटदारांची बिले दिले जात नाही, अशा एक ना अनेक प्रश्न, तक्रारी मिश्रा यांच्याविषयी असल्याचे नमूद करून आमदार बच्चू कडू यांनी डीएफओ मिश्रा यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.