अमरावती : जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६५२ वर पोहोचली आहे. याशिवाय २८६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ४७,२८३ झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार मोर्शी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा एक्झॉन रुग्णालय, तळेगाव येथील ५९ वर्षीय महिला, मोझरी येथील ६० वर्षीय महिला व नवसारी येथील ५० वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात तसेच दस्तुर नगरातील ७५ वर्षीय पुरुषाचा सनशाईन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मृत कोरोनाबाधितांची संख्या ६५२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ३,४८८ चाचण्या करण्यात आल्या. यात २८६ पॉझिटिव्हची नोंद झाली. यात ८.१९ पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. या आठवड्यात पॉझिटिव्हिटीत कमी येत असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
अद्यापही ४,०२४ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाही ४,०२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात १,०३९ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. महापालिका क्षेत्रात १,१७६ व ग्रामीण भागात १,८०९ रुग्ण‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. याशिवाय शुक्रवारी ३७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४२,६०७ वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ९०.११ टक्के आहे.