नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : हाताला काम देता हो का कोणी काम.... असे म्हणत ते मेळघाटातून थेट पुण्याला गेले. तेथे काम करू, दसऱ्यापूर्वी रक्कम गोळा करून घरी जाऊ, असा त्यांचा होरा. दोन दिवस फिरफिर करूनही हाताला काम मिळाले नाही तेव्हा त्यांनी नांदुरा (जि. बुलडाणा) रस्त्याच्या कामावर असलेल्या मित्राला फोन केला. त्याने बोलावून घेतले. रविवारी रात्रीच ते पोहोचले. जेवण करून रस्त्यालगतच्या झोपडीत झोपलेल्या या आदिवासींवर सकाळी काळाने झडप घातली. एकूण पाच जणांना ट्रकने चिरडले. त्यातील चौघे मोरगड (ता. चिखलदरा) या एकाच गावातील. तेथे आता स्मशानशांतता पसरली आहे. मृतदेह आणले जाण्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.
प्रकाश माकू धांडेकर, राजाराम दादू जांभेकर, अभिषेक रमेश जांभेकर व पंकज तुळशीराम जांभेकर (सर्व रा. मोरगड) व भूमिराम भोजराज असे झारखंड राज्यातील मृताचे नाव आहे. सोमवारी पहाटे ५:३० वाजता एका ट्रकने या पाच जणांना चिरडले. मेळघाटातील चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अन्य सहकारी जखमी असून त्यांच्यावर मलकापूर आणि इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच आ. राजकुमार पटेल यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ मदतकार्य पोहोचविण्याची व्यवस्था केली. माजी सभापती बन्सी जामकर, दादा खडके, प्रकाश जामकर व सहकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. मध्यरात्री मृतदेह पोहोचल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली.
कामाची मागणी नाही?
मेळघाटात मग्रारोहयोची कामे अल्प प्रमाणात सुरू आहेत. कामाची मागणी नसल्याची प्रशासनाची माहिती आहे. त्यांच्या लेखी, ३५ हजारांचे मनुष्यबळ तीन हजारांवर आले आहे. दुसरीकडे आदिवासी मजूर कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होऊन जीव गमावत आहेत. मोरगड येथील दहा मजुरांचा जत्था पुणे येथे गेला होता. काम न मिळाल्याने सहकारी प्रकाश याला त्यांनी फोनवरून कामाबाबत विचारणा केली आणि रविवारी रात्रीच पुण्यावरून वडनेर भुलजी येथील राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले होते.
शौचास उठले अन् बचावले
मृतक आणि गंभीर गाढ झोपी गेले होते, तर उर्वरित तिघे सकाळच्या स्वयंपाकाची त्यांची पाळी असल्याने उठले होते. ते शौचास निघून गेल्याने बेलगाम ट्रकखाली चिरडण्यापासून वाचले.
मोरगड गावात स्मशानशांतता
अपघातामुळे संपूर्ण मेळघाटात शोककळा पसरली आहे. मोरगड येथे मेळघाटातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जाऊन मृताच्या कुटुंबीयांची माहिती घेतली. गावात स्मशानशांतता पसरली आहे. पार्थिवाच्या प्रतीक्षेतील परिजन धाय मोकळून रडत आहेत.