लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.३० जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ५०२ प्रकल्पांत १६.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, सद्यस्थिती २२.७९ टक्के पाणी संचयित झाला आहे. पाच दिवसांतील पावसामुळे काही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठ्यात गतीने वाढ झाली असली तरी मोठ्या प्रकल्पांची पातळी चिंताजनक असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.सद्यस्थितीत मोठ्या नऊ प्रकल्पांत २१.८० टक्के, तर २४ मध्यम प्रकल्पांत ३४.०३ टक्के पाणीसाठा आहे. पूर्वीच्या तुलनेत मध्यम प्रकल्पांत ८.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ४६९ लघु प्रकल्पांतही वाढ झाली असून १७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, लघु व मध्यम असे एकूण ५०२ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्तसाठा हा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त जलसाठा ७२३.५१ दलघमी आहे. गेल्या आठवड्यात सार्वत्रिक पाऊस झाला असला तरी दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली. पण पाच दिवस रिमझिम तथा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. या आठवड्यात चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे तहानलेल्या मोठ्या प्रकल्पांची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सात टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:36 PM
पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत पाच दिवसांत सरासरी सात टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या नऊ प्रकल्पांत सरासरी ५.२८ टक्क्यांनी पाणी वाढल्याची माहिती जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिली.
ठळक मुद्दे मोठ्या नऊ प्रकल्पांत पाच टक्के वाढ आठवडाभर पावसाची शक्यता