गुन्हेगारी पार्श्वभूमी : नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, तणावसदृश परिस्थितीअमरावती : बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर मतदारांवर दबावतंत्र वापरण्याची दाट शक्यता असल्याच्या कारणामुळे पोलिसांनी उपमहापौर, माजी नगरसेवकांसह चौघांना ताब्यात घेतले. तब्बल चार तास स्थानबद्ध केल्यानंतर त्यांना अटी, शर्थीवर सोडण्यात आले.उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, माजी नगरसेवक कलंदरोद्दीन, अब्दुल रफीक ऊर्फ मौत, अहफाज खान, शेख आसीफ ऊर्फ काल्या, अनवर हुसैन महेमुद हुसैन अशी त्यांची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार, महेंदिया प्रभागात परंपरागत दोन विरोधी गट मतदारांवर दबावतंत्र आणून आपल्या समर्थकांना मतदान करण्याबाबत सांगत होते. त्यामुळे हे दोन्ही गट आमने- सामने आल्याने तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधितांना ताब्यात घेण्याचा निर्णय नागपुरी गेट पोलिसांनी घेतला. बुधवारी सकाळी ११ वाजता ताब्यात घेतल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास सहाही जणांना अटी, शर्थीवर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कलम ६८, ६९ अन्वये कारवाई करुन सोडण्यात आले. या सहाही जणांना मतदान केंद्रांवर फिरण्याची मनाई करण्यात आली. उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता पसरताच नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच समर्थकांनी एकच गर्दी केली. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. दरम्यान आ. रावसाहेब शेखावत दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोहचले. उपमहापौर शेख जफर यांची भेट घेतली. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चासुद्धा केली. ताब्यात घेण्याचे कारणमीमांसा जाणून घेतली. शेख जफर हे उपमहापौर आहेत. त्यामुळे ते त्यांच्याच प्रभागात राहतील, दुसऱ्या प्रभागात फिरणार नाही, अशी ग्वाही आ. शेखावत यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी लेखी स्वरुपात लिहून घेतल्यानंतर उपमहापौरांसह सर्वांनाच सोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी ताब्यात घेतलेले उपमहापौर शेख जफर, शेख आसीफ उर्फ काल्या, अनवर हुसैन महेमुद हुसैन हे आ. रावसाहेब शेखावत यांचे समर्थक आहेत. तर माजी नगरसेवक कलंदरोद्दीन बद्रोद्दीन, अब्दुल रफीक ऊर्फ मौत, अहफाज खान हे भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांचे समर्थक असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून या दोन्ही गटांवर पोलिसांची नजर होती. उपमहापौर शेख जफर आणि माजी नगरसेवक कलंदरोद्दीन हे परंपरागत राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात हे गट आपसात आमने- सामने येतील, असा कयास पोलिसांचा होता. नागपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल किंनगे हे या दोन्ही गटावर पाळत ठेवून होते. मतदानाच्या दिवशी हे दोन्ही गट राडा करतील. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना ताब्यात घेवून मुस्लिमबहुल भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची किमया पोलिसांनी केल्याचे दिसून आले.
उपमहापौरांसह पाच ताब्यात
By admin | Published: October 15, 2014 11:13 PM