अमरावती : ‘चकाचका चांदणी वो गोवारीयो बिनो, गायनेसे कोटा भरे, घरघर देबो आशिष गा’ अशा दादऱ्याच्या निनादात व गोहळा-गोहळीचे नृत्य करण्याकरिता विदर्भातील पाच हजार गावे ढाल पूजन उत्सवासाठी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या पाडव्याला हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. यानिमित्त पूर्व विदर्भातील गावांमध्ये पूर्वतयारी व सरावासाठी रात्र जागून काढली जात आहे.
गावातील गुरे-ढोरे चारून चरिचार्थ करणाऱ्या आदिवासी गोवारी समाजासाठी दिवाळीचा पाडवा हा पर्वणी ठरत असतो. सकाळी या जनावरांना लक्ष्मीसारखे सजवले जाते. सायंकाळी सर्व गायी-गुरे गावामधून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरेपर्यंत नाचविण्यात येते. तत्पूर्वी, दोन बाशावर फाडक्या बांधून पुरुष-ढाल म्हणजे गोहळा व स्त्री-ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात येते. दुपारी प्रथम सुताराच्या घरी पाणी पिण्याकरीता ढालीला नेल्यानंतर खऱ्या अर्थाने याच वेळी आदीवासी गोवारी नृत्याला प्रारंभ होते. डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल रंगल्याने नृत्यात रंगत येते.
हा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावागावांत पार पडतो. या उत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उत्सव सतत तीन दिवस चालतो. वर्षभर गायीचे राखण करणारे गोवारी बांधव गावातच धान्य गोळा करून संपूर्ण गावाला अन्नदान करीत असतात.
पुरातन परंपरा
ढालीच्या जंगो आणि लिंगो यांच्या प्रतिकात आपल्या पूर्वजांच्या नावाने ढाल निर्माण करून पूजन व उत्सव केला जातो. ही परंपरा पुरातन काळापासून आदिवासी गोवारी समाजात सुरू असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामदास नेवारे यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवारी जमात ही आदिवासी आहे. आमचा आदिवासींचा इतिहास न पाहता आमच्याविरुद्ध कटकारस्थाने रचली गेली. आम्ही निश्चितच पुन्हा आदिवासी असल्याचे सिद्ध करून दाखवू. प्रत्येकाने ढाल पूजन उत्सव साजरा करावा.
- सुदर्शन चामलोट, अध्यक्ष, आदिवासी गोवारी एम्प्लाॅइज संघ, अमरावती