अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागप्रमुखांनी तासिका प्राध्यापक (सीएचबी) देयकात फिक्सिंग केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नेट-सेट पीएचडी, सीएचबी कृती समितीने कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे केली आहे.
नेट-सेट पीएचडी, सीएचबी कृती समितीचे अध्यक्ष मंगेश ठाकरे यांच्या तक्रारीनुसार समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. के.बी. नायक यांनी सन २०२१-२०२१ या वर्षाकरिता विभागात पाच तासिका प्राध्यापकांना प्रत्येकी सहा तासिका अध्यापनासाठी आठवड्याकरिता वितरित केल्या होत्या. तासिका प्राध्यापकांना सोमवार ते गुरुवार असे वेळापत्रक तयार करून दिले होते. मात्र, तासिका प्राध्यापकांना वितरित केलेल्या तासिका आणि देयकात तफावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रत्येक महिन्याकाठी २४ तासिका होत असून, तासिका प्राध्यापकांनी मार्च, एप्रिल, मे महिन्यात अनुक्रमे २९, २५ व २६ तासिका घेतल्याचे दर्शविले आहे. देयकात प्रचंड तफावत असल्याची बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात कुलसचिव तुषार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
------------
ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने लूट
समाजशास्त्र विभागप्रमुखांनी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने विद्यापीठाच्या पैशाची लूट चालविली आहे. मर्जीतील तासिका प्राध्यापकांना हाताशी धरून भ्रष्टाचार, अपहार करण्यात आला आहे.
वित्त विभागाची देयके, नोटशीट या तासिका प्राध्यापकांच्या हातून तयार करून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत विद्यापीठाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
-----------------
तासिका प्राध्यापकांचे आदेशापूर्वीच देयके
विद्यापीठात तासिका प्राध्यापकांचे आदेशापृूर्वीच मानधनासाठी देयके सादर करून ती मंजूर करण्यात येत असल्याचा प्रताप समाजशास्त्र विभागात करण्यात आला आहे. तासिका प्राध्यापकांच्या मानधनात मोठा अपहार असल्याचा आरोप मंगेश ठाकरे यांनी केला आहे.