धीरेंद्र चाकोलकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पक्षिसंवर्धनासाठी आता बरेच हात सरसावले आहेत. त्यापैकी शहरातील वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने बांबू गार्डनमध्ये ‘पक्ष्यांसाठी आशियाना’ हा उपक्रम साकारला आहे. त्याची ११ मे रोजी उभारणी करण्यात आली. यात मातीची मडकी लोखंडी स्ट्रक्चरवर आडवी लटकवून त्यामध्ये पक्ष्यांसाठी तांदूळ, मूग डाळ, बाजरा अशा मिश्र धान्याचा चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते पाहून येथे भेट देणाऱ्या नागरिकांना बालपणीचे ‘चिऊ ये, दाना खा..!’ हे गीत ओठांवर आल्याशिवाय राहणार नाही.बांबू गार्डन विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्धीस येत आहे. येथे बांबूच्या ८० हून अधिक प्रजाती प्रत्यक्ष पाहायला मिळतात. शहरातील कुटुंबांना निसर्गाचे सान्निध्य मिळण्यासाठी हा परिसर विकसित करण्यात आला आहे. त्यात आता वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने पक्ष्यांसाठी आशियाना उभारून भर घातली आहे. येथे उभारण्यात आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरच्या साहाय्याने एकूण ४२ मडकी आडवी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मूठ-मूठ चारा भरण्यात आला. याशिवाय त्याखाली जलपात्रात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चारा टिपण्यासाठी आलेले पक्षी या मडक्यांमध्ये अंडी देतील आणि हे पक्षिजीवन येथे येणाऱ्यांना जवळून पाहता येईल, अशी संकल्पना त्यामागे आहे. वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी ही संकल्पना प्रत्यक्ष साकारली. त्यासाठी प्रवीण रामापुरे व सीमा थोरात यांनी सहकार्य केले.वनविभागाचे वर्तुळ अधिकारी प्रदीप बावणे, राजेंद्र घागरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (परीविक्षाधीन) प्रेम तिडके यांच्या हस्ते जलपात्रात पाणी टाकून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर व शेख सलीम यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले. या आशियानाची योग्य जबाबदारी घेण्याचे आश्वासन याप्रसंगी वर्तुळ अधिकारी प्रदीप बावणे यांनी दिले. जीवसृष्टी जगावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.आशियाना बांबू गार्डनप्रमाणेच इतर ठिकाणीही पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यात येणार आहे. शहरातीलच आॅक्सीजन पार्कमध्ये दोन, मोर्शी व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयामध्येदेखील प्रत्येकी एक घरटे साकारले जाणार आहे.अक्षय्य तृतीयेला मडकी खरेदी केली जातात. ती मडकी नंतर दुर्लक्षित होऊन अडगळीत पडतात. ती घराच्या समोरील भागात टांगल्यास पक्ष्यांना घरटे होऊ शकते. नागरिकांनी या दृष्टीने पुढाकार घ्यावा.- नीलेश कंचनपुरे
पक्ष्यांची ‘फ्लॅट स्कीम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:19 AM
पक्षिसंवर्धनासाठी आता बरेच हात सरसावले आहेत. त्यापैकी शहरातील वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने बांबू गार्डनमध्ये ‘पक्ष्यांसाठी आशियाना’ हा उपक्रम साकारला आहे. त्याची ११ मे रोजी उभारणी करण्यात आली.
ठळक मुद्देबहुमजली आशियाना। मडक्यांचा कल्पकतेने वापर, पाण्याचीही व्यवस्था