पोलिसांसह १४ जखमी : ८ जणांना अटक; तणावपूर्ण शांतताचांदूरबाजार : एसटी बसमध्ये जागेच्या कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात चकमक झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. देऊरवाडा येथे सोमवारी सायंकाळी ६.४५ ते ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जमावाला नियंत्रणात आणणाऱ्या सिरजगाव कसबा पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यात पाच पोलीसांसह दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील न११ जणांना ताब्यात घेतले आहे. देऊरवाडा येथील विद्यार्थी चांदूरबाजार येथे शिक्षणासाठी येतात. यात दोन्ही समुदायाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास देऊरवाडा येथे निघालेल्या एसटी बसमध्ये बसण्याच्या जागेवरून दोन गटाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. याची माहिती देऊरवाडा येथील नातेवाईकांना देण्यात आली. देऊरवाडा येथील बसस्टॉपवर एसटी पोहचताच एका गटाच्या काही लोकांनी दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. याचे पर्यावसान दोन्ही गट आमने-सामने आले. याची माहिती सिरजगाव कसबा पोलिसांना मिळताच एपीआय श्रीकृष्ण पवार यांच्यासह १० पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जमावाला पांगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसावरच एका गटाच्या जमावाने दगडफेक केली, त्यात एएसआय अशोक डोंगरकर, वाहन चालक नीलेश अवनकर, राजेश वासनिक, सचिन भुजाडे हे कर्मचारी जखमी झाले. तर, शुभम घायर (वय १७) हा विद्यार्थी गंंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देताच अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर, शिघ्र कृती दल, दंगा नियंत्रक पथकासह चांदूरबाजार, अचलपूर, परतवाडा, सरमसपूरा येथून पोलीस कुमक देऊरवाड्यात दाखल झाली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तर सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशीरा शे. अजीज शे. शब्बी (१९), रिजवानखां नजीरखा (१९), नाशीरखां मियाजखां (२०), शे. आजाद शे. प्यारो (३५), इबरसखान नाशीरखान (२५) यांच्यासह निखील कावलकर (१८), शुभम घायर (१७), अंकीत माहूरे (१६) यांना ताब्यात घेतले असून त्यांचेवर राईटचे गुन्हे दाखल केले आहेत. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी देऊरवाडा येथे भेट देऊन पुढील कारवाईचे निर्देश दिले.देऊरवाडा येथे येणाऱ्या बसमध्ये परिसरातील देऊरवाडा, काजळी, जसापूर, निंभोरा येथील शेकडो विद्यार्थी येतात. संख्येच्या प्रमाणात एसटीचे टाईमिंग वाढविण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीही एसटी विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार एसटीचे टाईमिंग वाढविण्यात आले तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने येथे येणाऱ्या गाडीत विद्यार्थ्यांची गर्दी अधिक असते. यापूर्वीही जागेच्या कारणावरून अनेकदा प्रवाशांमध्ये वाद झाले आहेत.(तालुका प्रतिनिधी)
देऊरवाड्यात दोन गटांत चकमक
By admin | Published: February 03, 2015 10:46 PM