लिंबू, करवंद, शेवगा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच वृक्षाचा समावेश
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील पुसनेर ग्रामपंचायतीने गावातील दहा एकर ई-क्लास जमिनीवर लिंबू, करवंद, शेवगा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच आदी फळे देणाऱ्या वृक्षांसह बांबू, कडुलिंब,पिंपळ,वड व इतर प्रजातीच्या सुमारे चार हजार वृक्षांची लागवड केली आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे, या हेतुने ही फळबाग लावण्यात आली असून, विविध प्राण्यांच्या, पक्षांच्या निवाऱ्यासाठी जैवविविधतेनुसार बऱ्याच वृक्षांची लागवड येथे करण्यात आली आहे. या फळबागेतील झाडे आता चार वर्षांची झाली असून, यातील लिंबू व करवंदाची फळे गावकऱ्यांना चाखायला मिळत आहेत.
नरेगाच्या मदतीने व ग्रामपंचायतीमधील चौदाव्या वित्त आयोगामधून तसेच सामान्य निधीमधून या वृक्षाच्या संगोपनाची व पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव यांचे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
वृक्षलागवडीसाठी पुसनेर ग्रामपंचायतचे सरपंच मदन काजे, उपसरपंच प्रफुल्ल खडसे, स्वयंसेवी संदीप काजे, ग्रामरोजगार सेवक रवि काजे, सुलतानपूरचे पोलीस पाटील पंकज काजे, सचिव विक्रम पिसे, चंदन गिरी व गावकऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
या गावाने हगणदरीमुक्त गाव, सन २०१८ ते २०२० सलग दोन वर्षे शंभर टक्के कर वसुली, वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस, आर.आर. पाटील सुंदर ग्राम योजनेत तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकाविले आहे.
-------------
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे, या हेतुने गावातच फळबाग निर्माण केली. त्यासाठी ग्रामस्थांची साथ लाभली.
- मदन काजे, सरपंच पुसनेर.