अमरावती: शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवघ्या ३४ दिवसांमध्ये ‘डेथ इन कस्टडी’च्या दोन घटना घडल्याने संबंधित पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. अशा घटना घडूच नयेत, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दृढ पाऊल उचलले असून, आता आयुक्तालयातील दहाही पोलीस ठाण्यावर दोन विशेष पथकांची नजर राहणार आहे. ही दोन्ही पथके आयुक्तालयातील पोलीस ठाण्याची आकस्मिक तपासणी करेल. तसे अधिकार त्यांना बहाल करण्यात आले आहेत.
बलात्काराच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या अरुण जवंजाळ यांनी गुरुवारी वलगाव पोलीस ठाण्यातील एका खोलीत शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी स्टेशन डायरीसह एकूण चार अंमलदार कार्यरत होते. घटनेवेळी अन्य तिघे पोलीस ठाण्यात उपस्थित नव्हते, तर महिला अंमलदार या फ्रेश होण्यासाठी गेल्या होत्या, असे सांगण्यात आले. ही घटना दुपारी ४ ची. त्यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी ७ पूर्वीची. या दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी घटनेवेळी गैरहजर असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. अधिक चौकशी केली असता पहाटे ४ ते ९ व दुपारी २ ते ५ या कालावधीत अनेक पोलीस कर्मचारी ठाण्यात गैरहजर राहत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्यापार्श्वभूमीवर या दोन विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
//////////////
एपीआयचे नेतृत्व
सहायक पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वातील या पथकात त्यांच्याशिवात अन्य दोन पोलीस कर्मचारी असतील. ते आयुक्तालयातील दहाही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आकस्मिक शहानिशा व खातरजमा करतील. पथकातील कर्मचारी बदलले जातील. ते त्यांचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करतील.
////////