- मोहन राऊत/धामणगाव रेल्वे (अमरावती) : चाराटंचाईवर मात करण्यासाठी अभिनव प्रयोग धामणगावात यशस्वी ठरला असून, ५० ग्रॅम गहू आणि ५० ग्रॅम मका बियाण्यापासून दोन किलो हिरवा चारा निर्माण करण्याची किमया धामणगाव येथील एका प्राध्यापकाने साधली आहे. त्यांच्या प्रयोगाने दुष्काळाच्या छायेत जगणाºया जनावरांसाठी संजीवनी मिळाली आहे.
अमृत गड्डमवार (३९) असे या संशोधकाचे नाव आहे. ते धामणगाव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनाचे नाव ‘नॉवेल ऑरगॅनिक मल्टिपल क्रॉप सिस्टीम’ असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित अविष्कार स्पर्धेत त्यांनी तो सादर केला. प्राध्यापक गटातून त्याची निवड गोंडवाणा विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी झाली आहे.
अशी झाली चारानिर्मितीसाध्या ट्रेला हवा आरपार जाण्यासाठी प्रथम काही छिद्रे पाडून घेतली. आठ ते दहा तास भिजविलेला गहू व मका ५० प्रत्येकी ५० ग्रॅम घेऊन त्यावर पसरविला. ओल्या गोणपाटाने ४८ तास झाकले. तीन दिवसानंतर कोंब आलेल्या या चाºयाच्या वाढीसाठी त्यावर सतत पाण्याचा स्प्रे केला. पाचव्या दिवसापासून डायल्यूट अमिनो आम्ल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे करण्यात आला. त्यामुळे आठ ते दहा दिवसांत एक ते दीड फूट उंच चारा तयार झाला.
अमिनो आम्लाचा वापर अमिनो आम्ल हे पिकांच्या अभिवृद्धीकरिता योग्य घटक आहे. हे अमिनो आम्ल अमृत गड्डमवार यांनी केसांपासून मिळविले; मात्र त्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी त्यांना द्यावा लागला. एकूण २० प्रकारांपैकी केसात १७ प्रकारचे अमिनो आम्ल असतात. ते पिकांकरिता वेगवेगळे कार्य करतात.
आठ ते दहा दिवसांत चारा बियाणे व ट्रे यांची जुळवणी करण्यापासून एक ते दीड फुटांची रोपे मिळविण्यापर्यंत आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. फक्त मका वा नुसता गहू या एकवर्णी बियाण्याचा वापर न करता दोन्ही पिकांतील सकस घटक जनावरांना मिंळावेत, हा हेतू असल्याचे अमृत गड्डमवार यांनी सांगितले.
प्रयोगशील संशोधक अमृत गड्डमवार हे धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागप्रमुख आहेत. त्यांच्या नावे सात पेटेंट असून, विविध देशांतील प्रकाशकांकडून त्यांची सात पुस्तके प्र्रकाशित झाली आहेत. विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत त्यांनी चार पुरस्कार पटकावले असून, तीनदा राज्य पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या हिरव्या चाºयाचे भाव १० रुपये प्रतिकिलो आहे. त्यापेक्षाही कमी पैशात चारा तयार होऊ शकतो. शेतकºयांचा त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार मोठ्या प्रमाणात चारानिर्मिती करावयाची असल्यास ड्रिपमध्ये टायमर सेट करून हा प्रयोग यशस्वी करता येईल. - अमृत गड्डमवार, प्राध्यापक, धामणगाव रेल्वे