चांदुर रेल्वे : तालुक्यातिल ग्रामीण भागात मागील १५ दिवसात ३२० ॲक्टिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे तर तालुक्यातील ९ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता भेडसावत आहे.
कोरोनाची दुसरी लाट शहरासोबत ग्रामीण भागात जास्त फोफावत आहे. तालुक्यातील कळमगाव, कलमजापूर, राजना, घुईखेड, मांडवा, सातेफळ, बागापूर, कावठा कडू इत्यादी गावात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. लॉकडाऊन लागले असले तरी बऱ्याच गोष्टींना मुभा दिली असल्याने मागील वेळी प्रमाणे हे लॉकडाऊन कडक नसल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. तर चांदुर शहरातही कोरोना संख्या वाढतच असून मागील १५ दिवसात शहरात ३८८ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
सकाळी ११ वाजेपर्यंत लॉकडाऊनमधून सूट असल्याने लोक खरेदीसाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र ही शहरात पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील पाच गावे अजूनही कोरोनामुक्त
कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेत प्रत्येक गाव आले असतांना तालुक्यातील पाच गावांना मात्र कोरोनाला वेशीवर थांबविण्यात यश आलेले पाहायला मिळत आहे. त्यात कमी लोकसंख्या असलेले तरोडा, गौरखेडा, खरबी याशिवाय धानोरा मोगल आणि भिलटेक या गावांचा समावेश आहे.
कोरोना लसीसह रॅपिड किटचा तुटवडा
तालुक्यात लसीसाठी नागरिक एकच गर्दी करीत असतांना दर दिवशी येणारी कोरोनाची लस कमी पडत असून सोबतच शहरातील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन किटचाही तुटवडा असल्याची माहिती आहे.