लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : येथून जवळील खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत घरांचे पुनसर्वेक्षण करून वाढीव मोबदला देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून खोपडा येथील ४०० महिला-पुरूषांनी तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.खोपडा येथील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका ग्रामवासियांनी घेतल्याने प्रशासन पूर्णत: हादरून गेले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महीला-पुरूष बेमुदत उपोषणाला बसल्यामुळे शासन व प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे मोर्शी तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.खोपडा येथील गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांची संयुक्त मोजणी भूसंपादन अधिकारी यांनी पूर्ण करून नोटीस प्रकाशित करण्यात आली. ग्रामस्थांना मूल्यांकनाचा अहवाल सादर करण्यात आला. सन- २०१४ मध्ये घरांची संख्या ४९८ होती. त्यानंतर बदल होऊन सन-२०१८ मध्ये घरांची संख्या ५१६ इतकी कशी झाली. काही लोकांचे संयुक्त मोजणी अहवालानुसार खाली प्लॉट दर्शविण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी मोठी घरे बांधण्यात आली. सन- २००९ ते २०१८ या दरम्यानच्या गाव नमुना आठ (अ) मध्ये काही विशिष्ट लोकांचे बांधकाम शक्य होते. त्या क्षेत्रावर विना परवानगी फेरफार करण्यात आला. सन- २०१४ च्या संयुक्त मोजणी अहवालानुसार घराच्या बांधकामासहित क्षेत्र हे वेगळे असून २०१८ च्या नोटीसमध्ये जास्त दाखविण्यात येऊन मुल्यांकन वाढविण्यात आले. या सर्व प्रकाराची १४ जानेवारी २०१९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होऊन झालेला गैरप्रकार पुराव्यासहीत सादर करण्यात आला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागदेवता मंदिराला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता पैसे निघाले कसे असा संतप्त सवाल ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. खोपडा गावाचा निवाडा करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. जुन्या संयुक्त मोजणी अहवालानुसार निवाडा पारित करण्यात यावा. नवीन भूसंपादन कायद्यानुसार गुणांक २ लावून ४ पट मोबदला देण्यात यावा, अन्यथा हे बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार खोपडा ग्रामवासियांनी व्यक्त केला. उपोषण मंडपस्थळी सोमवारी महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी भेट देऊन आंदोलनाला पांठीबा जाहीर केला. तसेच मागण्या रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणकर्त्यांमध्ये शशीकला सूर्यवंशी, वृषाली लुंगे, वर्षा तायडे, मंगला चौधरी, सुनीता भोजने, अरूणा ठाकूर, कांता मेश्राम, शोभा झोटींग, निर्मला चौधरी, सिंधू चौधरी, नलिनी कविटकर, पद्मा अमझरे, शकुंतला इंगोले, प्रकाश कुरवाळे, विलास कोठाळे, पंडित भोजने, प्रभुदास सूर्यवंशी, दिलीप चौधरी, प्रभाकर जवंजाळ, चंदू जवंजाळ, नरेंद्र रामटेके, रूपेश मेश्राम यांच्यासह शेकडो महिला-पुरूषांचा समावेश आहे. आता निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा पवित्रा खोपडा वासियांनी घेतला आहे.
खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पात गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:16 PM
येथून जवळील खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत घरांचे पुनसर्वेक्षण करून वाढीव मोबदला देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून खोपडा येथील ४०० महिला-पुरूषांनी तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देदोषींवर कारवाईची मागणी : तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू