फोटो पी २३ मोहन
धामणगाव रेल्वे : कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने येथील एक दाम्पत्य निराधार, दिव्यांगासाठी आधारवड बनले आहे. दोन वेळचे जेवणाचे डबे घरपोच पोहचवून भुकेलेल्यांना अन्न व तहानलेल्यांना ते पाणी देत आहेत.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी तथा पंचायत समितीच्या उपसभापती माधुरी दुधे व त्यांचे पती अविनाश दुधे यांनी अडीच वर्षांपूर्वी वृद्धाश्रमाचे ध्येय समोर ठेवून महीकृपा मल्टिपर्पज फाउंडेशनची स्थापना केली. मंगरूळ दस्तगीर या गावात ४० ते ५० निराधार व्यक्ती आहेत. यातच कुणाला निराधार योजनेचे येणारे मानधन दोन ते तीन महिन्यांनी मिळते. यात दिव्यांगाची संख्या या गावात अधिक आहे. या सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा निराधारांची व दिव्यांगाची यादी दुधे दाम्पत्याने तयार केली. त्यांना सकाळ संध्याकाळ घरपोच जेवणाचा डबा पोहचविण्याचे अविरत कार्य ते करीत आहेत.
विशेष म्हणजे, या निराधार आणि दिव्यांगाच्या आरोग्याची काळजीही घेतली जात आहे. त्यांच्या कोरोना चाचणीसोबतच त्यांना लसीही देण्यात आल्या. पंचायत समितीच्या उपसभापतिपदाचा कार्यभार सांभाळताना माधुरी दुधे पहाटे ४ वाजता उठून या निराधार वृद्धांसाठी जेवण तयार करतात, तर अविनाश दुधे हे दोन्ही सांजेला हे जेवण पोहचवून देतात.