कार्यालयासमोरच गुटख्याची राजरोस विक्री : अधिकार्यांचे दुर्लक्ष, पुरवठादार बिनधास्त पुरवतात मालप्रसन्न दुचक्के - अमरावतीशासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना शहरातील काही पानटपर्यांसह चक्क अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोरच गुटख्याची राजरोस विक्री होत असल्याचे वास्तव मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आपरेशनदरम्यान पुढे आले.गुटख्याच्या सेवनामुळे होणार्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा आयुक्तांनी १९ जुलै २0१२ रोजी संपूर्ण राज्यात गुटखाबंदीचे आदेश एक वर्षासाठी जारी केले होते. गुटख्यासह सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला, नागपुरी खर्र्याचे दुष्परिणाम लक्षात घेता आयुक्तांनी १८ जुलै २0१३ रोजी गुटख्यावरील कायमस्वरूपी बंदीचे आदेश जारी केले. परंतु बंदी आदेश झुगारून अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री दुपटीच्या भावात सुरू आहे. शहरातील काही पानटपर्यांवर तर खुलेआम गुटख्याची विक्री होते. काही पानटपरी चालकांनी तर ‘हद्द’च सोडल्याचे दिसते. बसस्थानक मार्गावरील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयापासून हाकेच्या अतंरावर काही पानटपरी चालक राजरोसपणे गुटखा विकत आहेत. ‘लोकमत’ने मंगळवारी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या ‘दिव्या’खालीच अंधार असल्याचे वास्तव समोर आले.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत’ प्रतिनिधी अन्न व औषधी प्रशासन कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी कार्यालयाशेजारी असणार्या काही पानटपर्यांवर त्यांना गुटखा, खर्रा व विविध पान मसाल्यांच्या पुड्यांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले. संबंधित पानटपरी चालक गुटख्याची दुप्पट भावाने विक्री करीत होते. हा गोरखधंदा चक्क अन्न, औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर सुरु होता, हे विशेष. याबाबत संबंधित अधिकार्यांना विचारणा केली असता अवैध गुटखाविक्रीवर कारवाई सुरु असल्याचे उत्तर मिळाले. एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात अन्न औषधी प्रशासनाकडून कारवाई सुरु असली तरी थेट या विभागाच्या कार्यालयासमोरच अवैध गुटखाविक्री सुरु आहे. अधिकारी निमूटपणे हा तमाशा पाहात आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांचेही दुर्लक्षशहरातील पानटपर्यांवर गुटख्याची राजरासपणे विक्री सुरु असताना अन्न व औषधी प्रशासनाप्रमाणेच पोलिसही निमुटपणे मुकदर्शक बनून हा तमाशा पाहत आहेत. यापूर्वी पोलिसांनी शहरातील अनेक गुटखा व्यावसायिकांवर कारवाई केली. परंतु ही कारवाई थातुरमातुर व पक्षपातपूर्ण असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. लहान व्यावसायिकांना टार्गेट करून बड्या माशांना आश्रय दिला जात असल्याने गुटख्याचा हा काळाबाजार खुलेआम सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अन्न औषधी प्रशासनाच्या ‘दिव्या’खाली अंधार
By admin | Published: May 29, 2014 11:28 PM