अमरावती : नांदगाव पेठ येथील ग्रामदैवत संत काशीनाथ बाबा यांचा भक्तवर्ग संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. त्यामुळे येथे भक्तनिवास आणि सभागृह असावे, या मागणीसाठी सोमवारी हजारो भक्तांच्या वतीने पायदळ दिंडी काढण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
नांदगाव पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा दिंडी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, भाविक नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. नांदगाव पेठ भाग २ मधील शेत सर्व्हे क्र. ४८८ मधील जागा ही भक्तनिवास आणि सभागृहासाठी देण्याची मागणी भक्तांच्या वतीने करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही ही जागा संस्थानला देण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीसह ग्रामसभेनेही या जागेसाठी ठराव दिलेला आहे. त्यामुळे भाविक, गावकरी व सर्वपक्षांच्या वतीने पायी दिंडी मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शांततेच्या व भक्तिमय वातावरणात आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली तसेच सकारात्मक चर्चा घडवून आणली.