बहिरम/परतवाडा : विदर्भातील सर्वांत प्रसिद्ध असलेल्या व सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेत शनिवारपासून मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. देशात पहिल्यांदा तिरंग्याला सलामी देत शेतकऱ्यांचा हा उत्सव सुरू झाला.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरील बहिरम यात्रा मागील एक महिन्यापासून लाखो भक्तांच्या दर्शन व भेटीने फुलली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस लाखांवर असलेली गर्दी, त्यासाठी प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि आवश्यकतेनुसार वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शनिवारपासून प्रहार संघटनेतर्फे लाखो रुपयांचे बक्षीस असलेली शंकरपट स्पर्धा सुरू झाली आहे. ध्वजपूजन परतवाडा येथील डॉ. प्रभू जवंजाळ यांनी केले.
स्वातंत्र्यपूर्व इतिहासात इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य आंदोलनाचे बीज बहिरम येथूनच पेरले गेले. स्वातंत्र्यानंतर १९७५ मध्ये एकाधिकारात कापसाच्या राज्यबंदीची बंधने तोडण्यासाठी आंदोलन बहिरम येथे झाले. त्याकाळी कापूस आंदोलनात गोळीबार करण्यात आला होता. त्यात कापूस उत्पादक तथा शेतकरी नेते विठ्ठलराव दुतोंडे शहीद झाले. बहिरमच्या परिसरातच देशाच्या महत्त्वाच्या क्रांतिकारकांच्या गोपनीय बैठका होत होत्या. स्वातंत्र्यलढ्याचे गनिमी कावे येथेच आखले जात होते. वऱ्हाडातील रणनीती याच मातीत पूर्णत्वास जात होती. या सर्व क्रांतिकारकांचा वावर मोठ्या प्रमाणात बहिरम परिसरात होता. त्यांच्या रक्ताने येथील भूमी पावन झाली आहे. संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने येथील नवसासाठी बोकडबळी प्रथा बंद झाली.
शहिदांना नमन, बहिरम एक आदर्श यात्रा
शहिदांना नमन म्हणून अचलपूर मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी शहीद बहिरम पुढील पिढीसाठी एक आदर्श व्हावे म्हणून बहिरम एक आदर्श यात्रा नावारूपास आणली. याकरिता गेले दहा वर्षे अनेक शासकीय, निमशासकीय कार्यक्रम बहिरम यात्रेत सुरू करण्यात आले.
शेती साहित्य, पेरणीचे नियोजन, बी-बियाणे
शेतातील पिके बाहेर निघाली, धान्याची विक्री झाली की, बहिरमची यात्रा सुरू होते. त्याचदरम्यान पुढच्या वर्षीच्या पिकाचे नियोजन, बी-बियाणे यावरसुद्धा या यात्रेत पूर्वी चर्चा व्हायची. शेती साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला यायचे. ही परंपरा आजसुद्धा कायम आहे.
रक्तपात नव्हे, रक्तदान आदर्श संदेश
यात्रेदरम्यान प्रहार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर सुरू आहे. शंकरपटात कुठल्याच प्रकारचा रक्तपात न होता एक आदर्श उपक्रम म्हणून व इतरांचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान ठरविण्यासाठी रक्तदान शिबिर घेतले जात आहे.
रोडग्याची यात्रा, तमाशावर बंदी
बहिरम यात्रेत शनिवारी दाखल झालेले आमदार बच्चू कडू यांनी काही वर्षांपूर्वी तमाशावर बंदी घातली. त्याला काही प्रमाणात प्रचंड विरोध झाला. मात्र, त्या मोबदल्यात त्यांनी विविध उपक्रम राबविले. वांग्याची भाजी, रोडगे आणि परंपरागत हंडीचे जेवण खवय्यांना आनंद देऊन जातो.