अमरावती : राज्याच्या वन विभागाचे नवीन वनबल प्रमुख म्हणून शैलेश टेभुर्णीकर यांच्या रूपाने तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठी अधिकारी मिळणार आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी वन विभागाचे प्रधान सचिव स्तरावरील त्रि सदस्यीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे वनमंत्री नव्या वनबल प्रमुखांच्या नियुक्तीची घोषणा करतील, अशी माहिती आहे.
विद्यमान वन बलप्रमुख वाय.एल.पी. राव हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहे. या पदासाठी सुनीता सिंह आणि शैलेश टेभुर्णीकर यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. हल्ली शैलेश टेभुर्णीकर हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) या पदावर कार्यरत आहे. तर १९८७ च्या बॅचच्या सुनीता सिंह या देखील या पदासाठी प्रयत्नरत आहे. सन २०१७ ते २०२१ या काळात त्या दिल्ली येथील ग्रामीण विद्युतेकरण महामंडळात प्रतिनियुक्तीवर होत्या. मात्र, राष्ट्रीय दक्षता आयोगाने त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहारावर ठपका ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे सुनीता सिंह की शैलेश टेभुर्णीकर यापैकी वनबल प्रमुख या सर्वेाच्चपदी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार कोणाची वर्णी लावतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणारे आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार करतील नावाची घोषणा
राज्याच्या वनबल प्रमुखपदी कोणाच्या नावाची वनमंत्र्यांकडे शिफारस करावी, यासंदर्भात वन खात्याचे प्रधान मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी बैठक होत आहे. भारतीय वनसेवेतील या पदाकरिता पात्र अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता आणि वन विभागाच्या कामाकाजाचा अनुभव, सेवाकाळात संबंधित अधिकाऱ्यांचे रेकॉर्ड आदी बाबी तपासून पात्र नावाची शिफारस वजा प्रस्ताव ही समिती वन मंत्र्याकडे करणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नवे वनबल प्रमुखांच्या नावांची घोषणा करतील, अशी ही प्रक्रिया असल्याची माहिती एका जेष्ठ वानधिकाऱ्यांनी दिली आहे,