अमरावती : प्रशासनातील २७ विभागप्रमुखांनी गुरुवारी मेळघाटातील विविध गावांत भेटी देऊन तेथील अडचणी समजून घेतल्या व मेळघाटात मुक्काम केला. शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांसमोर आदिवासी बांधवांच्या समस्या मांडल्या व त्याचा निपटारा करण्यासाठी सोल्युशनदेखील दिले. कायद्याच्या चौकटीत राहून अधिकाऱ्यांनी समन्वयकाची भूमिका घेतली.
मेळघाटाच्या इतिहासात पहिल्यांदा असे होत आहे व या आधारे मेळघाटचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, एकात्मिक बालविकास सेवा योजनेसह जिल्हास्तरावरील २७ यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटातील नागरिकांमध्ये स्वत: मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये कुपोषणाची समस्या, आरोग्याचे प्रश्न यांबरोबरच तेथील शेती, पेयजल, रस्ते, आदी गावपातळीवरील सुविधा, अडचणी, आवश्यक सुधारणा व स्थानिक समस्यांची माहिती यात घेतली गेलेली आहे.