अमरावती : पत्नीवर वारंवार अनैसर्गिक अत्याचार करत, देहविक्रय कर; पण मला पैसे आणून दे, अशी गर्भित धमकी देत पतीने पत्नीला घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीपक (४५, बजरंगनगर) याच्याविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबिक छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. ७ डिसेंबर रोजी रात्री ९.४४ च्या सुमारास त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तक्रारीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित तरुणीचे अमरावती शहरातील बजरंगनगरात राहणाऱ्या दीपकशी विवाह झाला. त्या दाम्पत्याला एक मुलगीदेखील आहे. आरोपी पती काही वर्षांपासून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करू लागला. नकार दिला असता, त्याने तिला अनेकदा मारहाण केली. तो तेवढ्यावर न थांबता त्याने तिच्या हातावर चटकेदेखील दिले. वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्यादरम्यान त्याने पत्नीशी भांडण केले. तथा नातेवाईकांकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. आणले तर बरं, अन्यथा काहीही कर, देहविक्रय कर; पण मला पैसे आणून दे, असे म्हणून तिला मला शारीरिक व मानसिक त्रास दिला. जीवाने मारण्याची धमकी देऊन त्याच दिवशी रात्रीदरम्यान घरातून हाकलून दिले. तिने रात्रभर उघड्यावर काढली. दुसऱ्या दिवशी माहेर गाठले.
भावाला घेऊन गाठले पोलिस ठाणे
घरातून हाकलून दिल्याने तिचे मामा- मामी तिला माहेरी अमरावतीला घेऊन आले. तिने येथे भावाला सोबत घेऊन गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपनिरीक्षक विजय गरूड यांनी तिची लेखी तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.