अमरावती : राज्याच्या कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली विदेशी कैदी बंदिस्त आहेत. मात्र, हे विदेशी कैदी जाचक अटी, नियमावलींमुळे सातासमुद्रापार नातेवाइकांसोबत संवाद अथवा भेटू शकत नाही. परंतु, राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांनी पाकिस्तान, बांग्लादेश वगळता अन्य विदेशी कैद्यांना आता नातेवाईक अथवा आप्तासोबत ई-भेट घेता येणार आहे. यात कैद्यांना १५ मिनिटे संवादाची मुभा असणार आहे. पण यातून देशविघातक, बॉम्बस्फोट वा गंभीर गुन्ह्यातील विदेशी कैदी वगळण्यात आले आहे.
राज्याच्या कारागृहात मुंबईचे आर्थररोड, पु्ण्याचे येरवडा, ठाणे, कल्याण नाशिक व नागपूर मध्यवर्ती कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांच्या आरोपात विदेशी पुरुष; तर भायखडा व ठाणे कारागृहात विदेशी महिला कैदी बंदिस्त आहेत. यात अमली पदार्थ तस्करी, ऑनलाइन फ्रॉड, बनावट पासपोर्ट, देशविघातक कारवाया, बॉम्बस्फोट, मासेमारी करताना सीमा ओलांडून आलेल्या विदेशी कैद्यांंचा समावेश आहे.
कारागृहात सामान्य कैद्यांसाठी ई-भेट उपक्रम सुरू झाला आहे. आता विदेशी कैद्यांनाही ई-भेटीचा लाभ घेता येणार आहे. पण यातून पाकिस्तान, बांग्लादेशातील कैदी वगळले आहे. तसेच देशविघातक, बॉम्बस्फोट वा गंभीर गुन्ह्यातील विदेशी कैद्यांना ई-भेटीची मुभा नाही.
- अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक, कारागृह प्रशासन, पुणे