अमरावती : २७ जुलै रोजी येथील एका मंगल कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविण्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, राजापेठ पोलिसांनी सोमवारी नोटीस जारी केली. त्यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. दुसरीकडे, भिडेंविरोधात आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सकल माळी समाजबांधवांनी मोर्चा काढून भिडेंच्या अटकेची मागणी लावून धरली. त्या मोर्चाला शिवसेनेच्या ठाकरे गटासह आझाद समाज पार्टीने पाठिंबा दिला होता.
संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत एका मंगल कार्यालयात उद्बोधन केले होते. त्या दरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले तथा महापुरुषांची बदनामी केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
सकल माळी समाज आक्रमक
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केल्यानेच महाराष्ट्राला पुरोगामित्व प्राप्त झाले आहे. अशा महामानवाविषयी संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह व कपोलकल्पित विधान केल्याने सकल माळी समाज आक्रमक झाला आहे. भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वक्तव्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या अनुयायांमध्ये कमालीची चिड व नाराजी झालेली आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी या धरणे आंदोलनात करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले. या आंदोलनात गणेश खारकर, राजेंद्र घाटोळे, श्रीकृष्ण बनसोड, अॅड. आशिष लांडे, वासुदेवराव चौधरी, मनोज भेले, अशोकराव दहिकर, अरविंद आकोलकर, अॅड. नंदेश अंबाडकर, गजानन लोखंडे, संजय नागोणे, प्रफुल्ल भोजणे, नंदकिशोर वाढ यांच्यासह शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.
गाडगेनगरमधील एनसीचा कोर्टाच्या आदेशाने तपास
आ. यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी दिल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी संबंधित द्विटर अकाउंटधारकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहून गाडगेनगर एसीपींनी न्यायालयाला तपासाची परवानगी मागितली. तत्पूर्वी, न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. पोलिसांच्या अहवालानुसार, सोमवारी गाडगेनगर पोलिसांना त्या अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासाची परवानगी देण्यात आली.