पायदळ गस्त : जंगल आगप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रारअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदला परिसरात सोमवारी लागलेल्या आगीत जळीत वनक्षेत्राची मोजणी पॉलिगॉन नकाशाद्वारे मंगळवारी करण्यात आली. जंगलाचे नेमके किती नुकसान झाले, याची चाचपणी करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी २५ ते ३० कि. मी. पर्यंत पायदळ गस्त घातली. जंगलाला आग लावल्याप्रकरणी २५ अज्ञात आरोंपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोहरा वनबीट अंतर्गत असलेल्या वनखंड क्रमांक ७० मध्ये इंदला, घातखेडा, बोडणा या परिसरातील जंगलाला आग लागण्याची घटना निदर्शनास आली. त्यानुसार वन विभागाने ही आग संयुक्त प्रयत्नातून विझविण्यात यश मिळविले. मात्र ही आग खोडसाळपणाने लावण्यात आल्याचे वनविभागाच्या लक्षात आले. पोहरा वनबीटमध्ये इंदला हा परिसर अतिशय संवेदनशील गणला जातो. जंगलाला आग लावण्यामागे वन्यपशुंची शिकार, अवैध वृक्षतोड तसेच गुरांना चारा मिळणे हा मुख्य उद्देश आहे. परंतु जंगलांना आग लावून मनसुबे साध्य करू पाहणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, यासाठी अमरावतीचे वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे यांनी अज्ञात २५ आरोपींविरुद्ध फौजदारी दाखल करण्यासाठी तक्रार दिली. दरम्यान जळीत वनक्षेत्राच्या मोजणीसाठी मंगळवारी वनविभागाची चमू दिवसभर जंगलात कार्यरत होती. पॉलिगॉन नकाशाद्वारे वन्यपशुंचे नुकसान, जंगलाची हानी, दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी ठरले काय? ते तपासण्यात आले. त्याकरिता वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर यांचे मार्गदर्शन सतत मिळत आहे. नकाशा काढण्यासाठी एन. के. ठाकूर, आर. एम. खडसे, पी. बी. शेंडे, नितीन नेतनवार, किशोर धोटे, छत्रपती वानखडे, बाबाराव पळसकर, प्रशांत कोरडे, बबलू कोहळे, दीपक नेव्हारे आदी वनकर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)
पॉलिगॉन नकाशाद्वारे जळीत वनक्षेत्राची मोजणी
By admin | Published: April 20, 2016 12:36 AM