गणेश वासनिक
अमरावती : राज्यात गत पाच वर्षात वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करतानाच दुसरीकडे वाघ, बिबट्याच्या शिकारीत वाढ झाली आहे. अशा घटनांचा आढावा घेण्यात येणार असून, वाघ, बिबट्याच्या हत्येची कारण मीमांसा शोधली जाणार आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी वन्यजीव विभागाची सूत्रे सांभाळल्यानंतर मानव - वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल, त्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यास प्रारंभ झाला आहे. गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. या काळात २५ पेक्षा जास्त वाघांच्या हल्ल्यात स्थानिक नागरिक मृत्यू झाले आहेत. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे.
सध्या चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात विद्युत प्रवाहाने १५ च्या वर वाघांचे बळी गेले आहेत. हे सत्र अद्यापही थांबले नाहीत. चंद्रपूर, गडचिरोलीत वाघांचे अस्तित्व असले तरी यवतमाळ, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वाघ आणि मान संघर्ष टोकाला जातो की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गत पाच वर्षात किती वाघ, बिबट ठार झाले. यात आरोपींची संख्या, पुढे याप्रकरणाचे न्यायालयात काय झाले?, याची माहिती संकलित केली जाणार आहे. याशिवाय वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.
वाघांचे स्थलांतरण वाढले
गत चार वर्षात वाघांचे स्थलांतरण वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ आता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात बिनदिक्कतपणे ये-जा करीत असल्याने याला संघर्षाची किनार लागली आहे. एरव्ही आपल्या हद्दीतून बाहेर न पडणारे वाघ अन्य जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे १५ वाघांनी अन्य जिल्ह्यात बस्तान मांडले आहे.
सौर कुंपणाचा आधार
वनक्षेत्रात वाघ, बिबट्याचे वास्तव आहे, अशा वनक्षेत्र लगतच्या शेतीला सौर कुंपणाची योजना मध्यंतरी वनविभागाने आणली. मात्र, त्यातील किचकट अटी मुळी ही योजना खुंटीला लटकली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वनक्षेत्र लगतच्या शेती शिवारात विहिरींना लोखंडी कठडे लावण्यावर मंथन झाले. मात्र, निधीची वाणवा असल्याने ही योजना रखडली आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण कुंपण योजनेला मान्यता देण्यास धजावत आहे. कारण या कुंपणामुळे वाघांचा संचार मार्ग बंद होण्याची भीती आहे.
व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे भम्रण मार्ग वाढले आहेत. स्थलांतरित वाघ प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात स्थिरावण्याची समस्या वाढली आहे. राखीव वनात वाघ असुरक्षित असल्याने आढावा घेण्यात येत आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.