अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुक्यात विविध प्रजातीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. याकडे वनविभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात विपुल वनसंपदा असून, वेगवेगळ्या प्रजातीची मोठे झाडे या परिसरात आढळून येतात. या वृक्षांच्या आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा आहे. मात्र, बेसुमार अवैध कत्तलीमुळे अंजनगाव परिसरातील वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोडीच्या परिणामी अंजनगाव शहरात मोठ्या प्रमाणात आडजातीच्या लाकडांचे ट्रक भरून येत आहेत.
वनविभाग तक्रारी देऊनसुद्धा डोळेझाक करत असल्याचे मत धनेगाव येथील शेतकरी मोहन हिवसे ांयांचा आक्षेप आहे. एक महिन्यापूर्वी त्यांनी बांधावरील झाड अज्ञात चोरट्याने तोडून नेल्याची तक्रार परतवाडा वनविभाग कार्यालयात केली होती. मात्र, वनविभागाने साधी चौकशीही केली नाही.
बाॅक्स......
वनविभागाचे कार्यालय नावापुरतेच
अंजनगाव परिसराचा भाग हा ४० किमी अंतरावरील परतवाडा कार्यालयातून सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे ठरले आहे. अंजनगाव परिसरासाठी कायमस्वरूपी आरएफओ असणे गरजेचे आहे. या परिसराला एक वर्षापासून आरएफओ अधिकारी कायमस्वरूपी नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.