आतून गणपावडरचा गंध, छातीवर झाडून घेतली गोळी, कर्मचाऱ्यांनी तोडले दार
पंकज लायदे
धारणी : राज्यातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून देशाच्या नकाशावर आलेले हरिसाल आज वरिष्ठ महिला वनाधिकाऱ्यांच्या आत्महत्येने हादरले. डॅशिंग अधिकारी म्हणून हरिसाल पंचक्रोशीत ओळख बनविणाऱ्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीसह शासकीय निवासस्थानी राहणाऱ्या दीपाली चव्हाण यांची आत्महत्या त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेजाऱ्यांसाठी ‘अविश्वसनीय व धक्कादायक’ राहिली.
‘तुम्ही तात्काळ घरी या, मला तुम्हाला शेवटचे बघायचे आहे. मला जगायची बिल्कुल इच्छा नाही, असे पती राजेश मोहिते यांना सांगत दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास फोन कट केला. म्हणून मोहिते यांनी वनमजूर संजू व रोशन मानके यांना फोन करून त्वरित घरी जा, पत्नी दीपाली हिची भेट घेऊन काय झाले, ते पाहण्यास सांगितले. त्यावेळी संजू व अन्य कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांचे क्वाॅर्टर गाठले. दार बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता, त्यांना त्या ठिकाणी गणपावडरचा वास आला. परिणामी, वनकर्मचाऱ्यांनी दार तोडले. बेडरूममधील पलंगावर चव्हाण या जखमी अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या बाजूला पिस्टल पडलेली होती. पिस्टलमधून गोळी छातीवर झाडून घेतल्याचे स्पष्ट झाले. २५ किमी अंतरावरील धारणीचे ठाणेदार विलास कुळकर्णी तातडीने रात्री ८ च्या सुमारास तेथे पोहोचले. तोपर्यंत दीपाली चव्हाण यांचे पतीदेखील पोहोचले. ते पोहोचताच एकच हलकल्लोळ उडाला. सायंकाळपर्यंत प्रत्येकाशी हसऱ्या चेहऱ्याने बोलणाऱ्या, स्मित हास्यी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची माहिती कर्णोपकर्णी झाली. सोशल मीडियावर वेगाने पसरली. मात्र, घटनास्थळी असलेल्या पती राजेश मोहिते, चव्हाण यांच्या सहकाऱ्यांना त्यावर विश्वासच बसत नव्हता.