पान ३ ची लिड
दोन बीटमधील वनसंपदेचे मोठे नुकसान, वन्य प्राणी, सरपटणारे प्राण्यांची पळापळ
अमोल कोहळे :
पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील उत्तर चोर आंबा बीटमध्ये शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले होते. जोराचा वारा वाहत असल्याने ही आग पसरत गेली. याच वेळी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील पश्चिम चिरोडी बीटलाही आगीने लक्ष्य केले. या आगीत छोट्या-मोठ्या नामवंत वृक्षांची राखरांगोळी झाली असून, वन्य प्राण्यांचे कळपाचे कळप जंगलातून तलावाच्या दिशेने पळ काढताना दिसून आले.
वन्यप्राण्यांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून पश्चिम चिरोडी बीट ओळखल्या जाते. चिरोडी वर्तुळातील पश्चिम चिरोडी बीट वन्यप्राण्यांच्या निवासाचे एकमेव ठिकाण असल्याने या जंगल भागात बिबट्यांसह सरपटणारे प्राणी ,कीटक आणि वन्यप्राण्यांची हजारोंच्या संख्येने मुक्त संचार असतो. अशातच नित्य लागणाऱ्या वणव्यामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या वणव्यामुळे ज्याप्रमाणे वनस्पतींचा साठा नष्ट होतो. तसाच याचा परिणाम वन्यप्राण्यांवरही होतो. वणव्यामुळे होरपळून अनेक वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचतो. परिणामी वन्यप्राणी सैरावैरा होऊन रस्त्यावर आल्याने वाहनाच्या अपघाताचे बळी ठरतात, तर खेड्यांच्या आजूबाजूने कूच करतात. उन्हाळ्याच्या या दिवसांत एकीकडे जंगलाला लागणारी आग, तर दुसरीकडे पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होऊन वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. शुक्रवारी लागलेल्या आगीत पश्चिम चिरोडी बीटमधील वन्यप्राणी जंगलाबाहेर पळताना आढळून आले आहे, हे विशेष.