अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांची निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात असल्याने त्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असून पुढारीही कामाला लागले आहेत.
विशेष म्हणजे, तब्बल ११ वर्षांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी एकूण १६८७ मतदार आहेत. २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. मागील २० वर्षांपासून बँकेवर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ती पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे या नेत्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी दंड थाेपटले आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारक्षेत्रात गत काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत मतदारांसोबत भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. कुठल्याही परिस्थिती जिल्हा बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी साम-दाम-दंडाचा वापर करण्याचेही फंडे वापरले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
काँग्रेस विरुद्ध भाजप, प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्ष अशा गटातटात ही निवडणूक लढविली जाण्याची दाट शक्यता आहे. अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत सहकार विभागाकडून सुरू होती. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.