धाडसी चोरी : जुना कॉटन मार्केट येथील घटना, घरफोडीचे सत्र सुरुचअमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तीन अट्टल चोरट्यांना अटक करुन पाठ थोपटून घेण्याचा कांगावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिचून घरफोडीच्या घटनांची मालिका शहरात सुरुच आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांचे प्रतिष्ठान फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे. या घटनेने पुन्हा चोरटेच पोलिसांवर भारी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन अट्टल चोरट्यांना पकडण्यात यश मिळविले. अटकेदरम्यान त्यांनी पोलिसांना शहरातील १४ घरफोडींच्या घटनांची कबुली दिली. आरोपींकडून पोलिसांनी लाखो रूपयाचा माल जप्त केला. घरफोडी करणारी टोळी हाती लागल्याचे सांगत पोलीस स्वत:ची पाठ थोपाटूून घेत असले तरी, शहरात अद्यापही चोरीची मालिका सुरूच असल्याचे वास्तव पुढे आले आहे. सोमवारी अज्ञात चोरट्यांनी गजबजलेला चौक असलेल्या जुना कॉटन मार्केट येथील माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांच्या किराणा स्टोअर्समध्ये धाडसी चोरी केली. मंगळवारी सकाळी ६ वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेवरून सामान्य नागरिकांप्रमाणे माजीमंत्रीही असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक जुना कॉटन मार्केट येथे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार जगदीश गुप्ता यांच्या मालकीचे होलसेल किराणा स्टोअर्स आहे. हे दुकान संदीप सुरेश गुप्ता (३९) हे चालवितात. सोमवारी रात्री १० वाजता संदीप हे दुकान बंद करुन घरी गेले. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या वरच्या माळ्यावर असणाऱ्या गुप्ता यांच्या घरातून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातून १० हजार रूपये किमतीचे चांदीचे २० शिक्के व रोख दोन हजार रूपये असा एकूण १२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळावरून पळ काढतांना चोरट्यांनी गुप्ता यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा बाहेरून बंद केला होता.मंगळवारी सकाळी ६ वाजता दुकानामध्ये चोरी झाल्याची बाब संदीप यांच्या निदर्शनास आली. ही माहिती त्यांनी शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंविच्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंदविला.तीन महिन्यात चोरट्यांनी शहर आयुक्तालयाच्या हद्दीत उच्छाद मांडला असताना आतापर्यंत आतापर्यंत पोलिसांनी केवळ पाच चोरटे पकडले. परंतु चोरीचे सत्र कायमच आहे. चोरीच्या घटना थांबविण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. यातच गजबजलेल्या चौकातील माजी पालकमंत्र्यांच्या व्यापारी प्रतिष्ठानात चोरट्यांनी प्रवेश करुन ऐवज लंपास केला.
माजी पालकमंत्र्यांचे प्रतिष्ठान फोडले
By admin | Published: July 01, 2014 11:11 PM