फोटो - १७एएमपीएच०१
अमरावती : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे १९ जून रोजी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे टिळक भवनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस अविनाश पांडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांच्या उपस्थितीत ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील. डॉ. सुनील देशमुख यांना २००९ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे अमरावती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमरावती मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर ते आमदार झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा डॉ. देशमुख हे काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. डॉ. देशमुख यांच्या प्रवेशाने काँग्रेसला बळकटी येईल, असे सध्या चित्र आहे. अमरावती महापालिकेत २२ नगरसेवक त्यांचे समर्थक असल्याची राजकीय सूत्रांची माहिती आहे.
-------------
कोट
माझी विचारधारा ही कॉंग्रेसची आहे. राजकारण जेव्हा कळायला लागले तेव्हापासून कॉंग्रेसमध्येच आहे. सन २००९ मध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडावे लागले. असो, ‘देर आये दुरुस्त आये’. पुन्हा आपल्या घरी परत जात आहे.
- डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री