वरूड : शेंदूरजनाघाट येथून वाई मलकापूर रस्त्याने आठ गाई कत्तलीसाठी नेत असताना शनिवारी रात्री १२ वाजता नाकेबंदी करून पकडण्यात आल्या. यामध्ये चार आरोपींना अटक करून गुन्हे नोंदविण्यात आले, तर शेंदूरजना घाट पोलिसांच्या सतर्कतेमुळे गाईंना जीवदान मिळाले.
पोलीस सूत्रांनुसार, इफ्तेखार अहमद शेख कालू कुरेशी (४२), अब्दुल हकीम वल्द अब्दुल कयूम कुरेशी (४२, दोन्ही राहणार कुरेशीपुरा, मलकापूर), गेंदू व्यंकटराव धुर्वे (४५), पंचराम रतीराम धुर्वे (४५, दोन्ही रा. खडकी, ता. मुलताई, जि. बैतूल) अशी आरोपींची नावे आहेत. १७ जुलैला रात्री १२ च्या सुमारास वाई ते मलकापूर रोडने कत्तलीकरीता गाई नेत असल्याची गोपनीय माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार श्रीराम गेडाम, उपनिरीक्षक सचिन कानडेसह पोलीस पथकाने नगर परिषद मलकापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ नाकाबंदी केली. यावेळी १ लाख १० हजार रुपयांच्या गाई घेऊन चालले होते. गाई जप्त करून मलकापूर गौरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्या. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्यासह शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.