लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका झोपडीत हरणाची शिकार करून तब्बल दीड किलो मांस रंगेहाथ पकडल्याची घटना भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, १६ जूनपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. रामेश्वर श्रीराम घांडेकर (२५, रा. जामलिया, ता. चिखलदरा), सुरेश बुडा कास्देकर (३०, रा. सलोना, ता. चिखलदरा), संजू राजू कास्देकर (३५, रा. सलोना, ता. चिखलदरा), आकाश ओंकार इटके (२२, रा. पूर्णानगर, ता. चिखलदरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सध्या या चारही जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.वडाळी वन विभाग, फिरत्या पथकाने पूर्णानगर येथे धाडसत्र राबविले. झोपडीची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, वन्यप्राणीसदृश मांस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शुक्रवारी उशिरा रात्री अटकेतील चारही आरोपींना न्यायाधीशांसमक्ष उभे केले असता या चारही आरोपींना १६ जूनपर्यंत न्यायाधीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चारही आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, साहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वडाळी आरएफओ वर्षा हरणे यांनी केली आहे. या कारवाईत फिरत्या पथकाचे सचिन नवरे, वडाळी वनपरिक्षेत्रातील वनपाल माधुरी नितनवरे, एस. एम देशमुख, वनरक्षक पी. एस. खाडे, व्ही. जे. बनसोड, सचिन वानखडे, अंसार दर्गीवाले, कैलाश इंगळे, सी. बी. चोले व संदीप चौधरी आदींचा सहभाग होता.