अमरावती : येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वसाहतीत राहणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यात एका फ्लॅटमधून १८० ग्रॅम सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख असा ऐवज लंपास करण्यात आला. मात्र, दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २२ हजार रुपये रोख, असा ऐवज चोरीला गेला. दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील अन्य दोन घरेदेखील फोडण्यात आली. मात्र, तेथे चोरांच्या हाती काहीही लागले नाही. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी या चारही घटना उघडकीस आल्या.
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसाठी त्याच परिसरात दोन तीन मजली वसाहती आहेत. यातील जिजाऊ या अपार्टमेंटमध्ये राहणारे गोपाल तेजूलाल लावरे (६३) हे कुटुंबासह मूळ गावी धामणगाव रेल्वेला गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातील अंगठी, कानातील जोड, पोतसह १८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २३० ग्रॅम चांदी व रोख ३ लाख रुपये असा लाखोंचा ऐवज लांबविला. त्यानंतर चोरट्यांनी याच वसाहतीत राहणाऱ्या तुषार भुजाडे यांच्या बंद फ्लॅटलाही लक्ष्य केले. मात्र, त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान, वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने गोपाल लावरे व तुषार भुजाडे यांना मोबाइलवर कॉल करून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी तातडीने फ्लॅट गाठून पाहणी केली. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
याबाबत माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गोपाल लावरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे. गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने व गुन्हे शाखा प्रमुख आसाराम चोरमले यांनी सुपरच्या वसाहती गाठल्या. तथा तेथील बंद सीसीटीव्ही सुरू करण्याची सूचना केली.
अहिल्या अपार्टमेंटमध्येही चोरी
‘सुपर’मधील जिजाऊ अपार्टमेंटलगतच्याच अहिल्या नामक अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील दोन सदनिका फोडण्यात आल्या. तेथील नितीन सवाळे यांच्या सदनिकेतून ८० ग्रॅम सोन्याचे दागिने व २२ हजार रुपये रोख लंपास करण्यात आली. सवाळे यांच्यालगतचा एक फ्लॅटदेखील फोडण्यात आला. चोरांनी अन्य फ्लॅटचा कडी-कोंडा बाहेरून लावून घेतला होता. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.