अमरावती : महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीच्या वेळेत चार तासांची कपात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यांना आता केवळ आठ तासांची ड्यूटी करावी लागणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता हा निर्णय महिला पोलीस भगिनींना दिलासादायी ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
महिला कर्मचाऱ्यांना निकोप, सुरक्षित वातावरणात काम करता यावे. त्यांना शासकीय कर्तव्याबरोबरच इतर जबाबदाऱ्याही पार पाडता याव्यात, यासाठी विविध क्षेत्रात व विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण निर्णय होत आहेत. त्यानुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील विविध जबाबदाऱ्या पाहता ड्युटीच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय या महिला भगिनींना दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्यूटीचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी निर्मगित केला. तसेच जिल्ह्यांतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनीही तसा आदेश निर्ममित केला आहे. शहरात २७५, तर ग्रामीणमध्ये ४२७ अशा जिल्ह्यातील ७०२ महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.