धामणगाव रेल्वे (अमरावती) : शंकरपट पाहून घराकडे परतणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. दुसऱ्या घटनेत यवतमाळहून धामणगावकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांना कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे व कारचालक असे तिघे जागीच ठार झाले. या घटना रात्री नऊ वाजता तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
तळेगाव दशासर येथे शंकरपट १२ जानेवारीपासून सुरू झाला आहे. सोमवारी या शंकरपटातील बैलांच्या शर्यती पाहून पुलगाव तालुक्यातील बोदवड मलकापूर येथे घरी परतणाऱ्या आशिष दिनकर ईरपाते (२५) व त्याचा मित्र अक्षय गजेंद्र शिंदे (२८) यांच्या दुचाकीला देवगावजवळील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकने धडक दिली. यात आशिष जागीच ठार झाला, तर अक्षय गंभीर जखमी आहे. तळेगाव पोलिस ठाण्याचे जमादार गजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अक्षयला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
देवगावजवळ तीन ठार
देवगावजवळ कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांसह कारचालक जागीच ठार झाले. दोघेही मृत पिंपळखुटा येथील रहिवासी आहेत. संतोष बबन फटे ( ३०) असे एका मृताचे नाव असून दुसऱ्या २८ वर्षीय युवकाच्या हातावर प्रदीप असे गोंदलेले आहे. मृत कारचालकाचे नाव श्रीकांत मोहन पवार (२२, रा. अंगाईत, ता. मोर्शी) असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार ही देवगाववरून बाभूळगावकडे जात होती. दुचाकी यवतमाळहून धामणगावकडे येत होती. देवगावजवळील पाटेकर यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहेत.