विशेष अभियान : सर्वच शेतकऱ्यांना होणार कर्जाचा लाभगजानन मोहोड अमरावतीसर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केले जात आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा राबविल्या जात असलेल्या ‘स्पेशल ड्राईव्ह’मध्ये तालुकास्तरावरील चमू प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहे. सध्या चार लाख १५ हजार ८१८ शेतकऱ्यांपैकी चार लाख ८ हजार ९४१ शेतकऱ्यांना सभासद करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सोसायटीच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ मिळावा व तो आर्थिक संपन्न व्हावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला गावातील सेवा संस्थेचा सदस्य करण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात ६२३ सेवा सहकारी सोसायटी आहेत. यासोसायटींचे सभासद होण्यास काही अटी आहेत. त्यामुळे अनेक ७/१२ धारक शेतकरी अद्यापही संस्थांचे सभासद झालेले नाहीत. यामुळे त्यांना सोसायटीच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही, डॉ. पंजाबराव देशमुख व्याजसवलत योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जिल्हा बँकेचे कर्जही मिळत नाही. इतर अनेक सुविधांपासून शेतकरी वंचित राहतात. यासाठी सहकार विभागाने ‘अॅक्शन प्लान’ तयार केला असून तालुकास्तरावर पथक तयार करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. गावस्तरावर सभा घेणे, भित्तीपत्रकाद्वारे व गावस्तरावर दवंडी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत. शासनाच्या सहकारविषयक धोरणामुळे सहकारक्षेत्रात ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापितांना फटका बसेल.११ हजार शेतकरी सभासद होणे बाकीजिल्ह्यात एकूण ४ लाख १५ हजार ८५८ शेतकरी सभासद आहेत. यापैकी ४ लाख ८ हजार ९४१ शेतकरी सभासद होण्यास पात्र आहेत. यापैकी ३ लाख ९७ हजार ८१३ शेतकरी हे सोसायटींचे सभासद झालेले आहेत. अद्याप ११ हजार ४८ शेतकरी हे सोसायटींचे सभासद होणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. -तर शेतकरी करू शकतात अपीलएखाद्या सेवा सहकारी सोसायटीने शेतकऱ्याला सभासदपद देण्याचे नाकारल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम २३ नुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सभासदपद मिळणेबाबत अपील करता येते. १० आर.क्षेत्रधारणा हवीसोसायटीचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्जदार व्यक्ती ही १८वर्षांपेक्षा अधिक वयाची हवी, ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी हवी व त्या व्यक्तिकडे किमान १० आर. क्षेत्रधारणा हवी. याविषयीचा सातबारा त्याने अर्जासोबत जोडावा तसेच पोटनियमाप्रमाणे १०० रुपये शुल्क व १०० रुपयांचा एक भाग संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे६ हजार ९१७ शेतकरी अपात्रसहकारी सोसायटींचे सभासद होण्यास ६ हजार ९१७ शेतकरी अपात्र आहेत. यापैकी १२५० शेतकरी मृत आहेत तर १२४५ शेतकरी अज्ञान आहेत. १३७७ शेतकरी गाव सोडून निघून गेले आहेत व २०४५ शेतकरी शेती विकून भूमीहिन झाले आहेत.जिल्ह्यात ११ हजार शेतकरी सभासद होणे बाकी आहे. त्यांनी सभासद व्हावे, यासाठी प्रत्येक गावात स्थानिक पथकाद्वारे जनजागृती सुरू आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक
चार लाख शेतकरी झाले सोसायटींचे सभासद
By admin | Published: February 02, 2017 12:01 AM