सहकाराची पायाभरणी : सात हजार २२६ खातेदार होणे बाकीअमरावती : गावांगावांतील सेवा सहकारी सोसायटीद्वारा प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ मिळावा व याद्वारे सहकाराचा पाया असणाऱ्या सोसायटींमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मताधिकार असावा, यासाठी सहकार विभागाद्वारा ‘स्पेशल ड्राईव्ह’ सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण चार लाख १५ हजार ८५८ पात्र खातेदारांपैकी चार लाख एक हजार ७१४ शेतकऱ्यांना सोसायटीचे सभासद करण्यात आले आहे. पात्र खातेदारांपैकी सात हजार २२७ शेतकरी अद्याप खातेदार व्हायचे आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला सोसायटीच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ मिळावा व यातून तो आर्थिक संपन्न व्हावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला गावातील सेवा सहकारी सोसायटींचा सदस्य करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात एकूण ६२३ सहकारी सोसायटी आहेत. परंतु या सोसायटींचे सभासदत्व मिळविण्यासाठी काही अटी आहेत. त्यामुळे काही शेतकरी अद्याप या सोसायटींचे सभासद झाले नव्हते. त्यामुळे त्यांना शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नव्हता. आता मात्र सहकार विभागाने गावपातळीवर अभियान राबवून प्रत्येक शेतकऱ्याला सोसायटींचे खातेदार केले आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान यशस्वी करण्यात आले.एखाद्या सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना सभासदत्व नाकारल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ नुसार सहायक निबंधक सहकारी संस्था, यांच्याकडे सभासदत्व मिळण्याबाबत अपील करता येते. शेतकऱ्याला सभासद होण्यासाठी अर्ज करावा लागतो व अर्जदार हा १८ वर्षांच्यावर हवा. ही व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावी, याविषयीचा सातबारा शेतकऱ्याला अर्जाप्रमाणे जोडावा लागतो. पोटनियमाप्रमाणे १०० रुपयांचे सभासद शुल्क व १०० रूपयांचा एक भाग संस्थेकडे जमा करून शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटींचे सभासद होता येते. याद्वारे सहकारात त्यांना मताधिकार मिळून सहकारक्षेत्र समृद्ध होण्यास मदत होणार आहे. शिवाय विविध सुविधा देखील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. (प्रतिनिधी)फेब्रुवारीत ३८२१ खातेदार सभासदफेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्ह्यात ३८२१ खातेदारांना सभासद करण्यात आले. यामध्ये अमरावती तालुक्यात ३८६, भातकुली ४३, चांदूररेल्वे ९१, धामणगाव २३८, अचलपूर ५८७, मोर्शी १९८, वरूड ४०५, दर्यापूर १०२६, अंजनगाव सुर्जी ५९९ व चांदूरबाजार तालुक्यात २४८ सभासद करण्यात आले. नांदगाव, तिवसा, धारणी व चिखलदऱ्यात नोंदणी निरंक आहे.
चार लाख शेतकऱ्यांना सोसायटीत मताधिकार
By admin | Published: March 22, 2017 12:09 AM