- गजानन मोहोड
अमरावती : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी शनिवारी जाहीर केली. यामध्ये १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे थकबाकीदार शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात तीन लाख ९६ हजार ६७५ नियमित कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफीऐवजी प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
एकापेक्षा अधिक कर्जखात्यांत अल्पमुदती पीककर्ज व या कर्जाच्या पुनर्गठित खात्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सरकारने ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखांची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता.
या योजनत नियमित शेतकरी खातेदार प्रतीक्षेतच राहिले होते. या शेतक-यांना केवळ २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात आला. कर्जाचा एकरकमी भरणा करणा-यांनादेखील अशाच पद्धतीने लाभ देण्यात आलेला आहे. सध्याच्या शासनानेदेखील हीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारकडून नियमित शेतक-यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, याविषयी कोणतीही घोषणा न झाल्याने त्यांच्यात आता शासनाप्रती असंतोष आहे.
तीनही कर्जमाफीत नियमित कर्जदार डावललेआतापर्यंत तीन वेळा म्हणजेच सन २००८, सन २०१७ व यंदा झालेल्या कर्जमाफीत केवळ थकबाकीदार शेतक-यांनाचा लाभ झालेला आहे. यंदा अवकाळी पावसाने सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, ही विवंचना त्यांच्यासमोर आहे. या सर्व शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हानिहाय नियमित कर्जदार शेतकरीअमरावती जिल्ह्यात ४९ हजार ९०२, अकोला जिल्ह्यात ५३ हजार ४०, वाशीम जिल्ह्यात ३६ हजार १५२, बुलडाणा जिल्ह्यात ५२ हजार ६१९ व यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६७५ असे एकूण ३ लाख ९६ हजार ५७५ नियमित कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे १ लाख ७६ हजार २९८, राष्ट्रीयीकृत बँकांचे २ लाख २ हजार ८७२ व ग्रामीण बँकांचे १७ हजार ४०५ शेतकरी नियमित कर्जदार आहेत. या खातेदारांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.