वाढोणा रामनाथ : येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे. पाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या वाढोणा रामनाथ येथे दरवर्षी पाणी टंचाईची भीषणता जाणवत होती. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ३२ लाख रूपयांची भारत निर्माण योजना अमलात आणली. योजनेंतर्गत गावात नळाची पाईपलाइन, नळ योजनेची विहीर आणि पाण्याची टाकी आदींचा समावेश होता. भारत निर्माणच्या संपूर्ण योजनेमध्ये शासनाकडून २७ लाख ५४ हजार ३२९ रूपये तीन टप्प्यात स्थानिक पाणीपुुरवठा समितीच्या बँक खात्यात जमा झाले होते. ३ लाख २२ हजार ३०० रूपये लोकवर्गणीसुद्धा समितीकडे जमा करण्यात आली, असे एकूण ३० लाख ७६ हजार ६२९ रूपये जमा झाले. प्रत्यक्षात २६ लाख ८० हजार ५०१ रूपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अमरावती यांनी तसा प्रत्यक्ष मूल्यांकन अहवाल सादर केला. त्यामुळे उर्वरित ३ लाख ९६ हजार १२८ रूपयांचा अपहार पाणीपुरवठा समितीने केल्याचा अहवाल जि.प.ने दिला. तो अहवाल जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १७ आॅक्टोबर रोजी स्थानिक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. पत्रामध्ये ३ लाख ९६ हजार १२८ रूपये अपहार योजनेमध्ये झाला आहे. तो त्वरित जिल्हा परिषद कार्यालयात भरणा करावा. अन्यथा समितीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. एकूण ३२ लाख रुपयांच्या योजनेतील ३० लाख ७६ हजार ६२९ रुपये प्रत्यक्षात पाणीपुरवठा समितीने खर्च दाखविला आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने न झाल्याने नागरिकांना आजही खड्डे खोदून पाणी काढावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
भारत निर्माण योजनेत चार लाखांचा अपहार
By admin | Published: November 27, 2014 11:27 PM