नरेंद्र जावरे
अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या ‘त्या’ आपल्या आरोग्य तपासणीसाठी १५ दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. यादरम्यान पायाला थंडीमुळे भेगा पडू नयेत, यासाठी विशिष्ट प्रकारची चौकिंग ही औषधोपचार पद्धत नेहमीप्रमाणे ३ ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत केली जाणार असून, त्यानंतर त्या नियमित रूपाने पर्यटकांच्या सेवेत सुंदरमाला, जयश्री, चंपाकली, लक्ष्मी हजर होणार आहेत.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सेमाडोह, कोलकास, आमझरी येथे देशभरातील पर्यटक पर्यटनाची मौज करण्यासह जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी येतात. कोलकास येथे सिपना वन्यजीव विभागात अंतर्गत असलेल्या चार हत्तीचे चोपिंग करावयाचे असल्याने हत्ती सफारी बंद राहणार आहे. याबाबत पर्यटकांची गैरसोय होऊ नये, याकरिता जागर प्रकल्पाच्या वतीने सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी कळविले आहे.
चोपिंग व वार्षिक तपासणी
कोलकास संकुल येथे पर्यटकांसाठी सफारीला सुंदरमाला, जयश्री, चंपाकली, लक्ष्मी या चार हत्ती तैनात आहेत. त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे. तसेच वाढत्या थंडीमुुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडू नयेत, याकरिता चोपिंग करणे आवश्यक असते. जेणेकरुन हत्तीचे आरोग्य व्यवस्थित राहील. त्याकरिता ३ ते १७ जानेवारी २०२२ हे पंधरा दिवस हत्ती सफारी बंद ठेवण्यात आली आहे.
थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडू नयेत, यासाठी चारही हत्तींची आरोग्य तपासणी करून वार्षिक चोपिंग ही पध्दत केली जाते. त्याकरिता कोलकास येथील हत्ती सफारी पंधरा दिवस बंद राहणार आहे.
सम्राट मेश्राम
वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमाडोह