अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मोबाईल टॉवरचे केबल चोरणारी टोळी गजाआड केली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. तर दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. २१ एप्रिल रोजी ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
जगदीश शिवदास पांडे (२८), कुणाल नंदकिशोर श्रीवास (२६, दोघेही रा. अंजनसिंगी), रेहान खान हसन खान (२४, रा. कु-हा) व सुरज हनुमंता मेश्राम (१८ वर्ष, रा. धारवाडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मोबाईल कंपन्यांचे टाॅवरच्या केबल चोरीच्या घटनांना त्वरीत आळा बसण्याकरिता व घडलेल्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले होते. त्यानुसार, मंगरूळ दस्तगीरचे पोलीस पथक २१ एप्रिल रोजी गस्त करीत असताना जगदीश पांडे व त्याचे इतर साथीदार हे मोबाईल टाॅवर केबल चोरीचे गुन्हे करित असून सध्या ते गुन्हा करण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने अंजनसिंगी बस स्टॅन्ड जवळ सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.
आरोपींनी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात नोंद दोन व कुऱ्हा, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे नोंद अशा एकुण चार गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून चोरीचे गुन्हयातील केबल जाळून काढलेले कॉपर तथा गुन्हयात वापरण्यात येणाऱ्या दोन दुचाकी असा १ लाख १५ हजारांचा माल जप्त केला. यातील अन्य एक आरोपी फरार आहे. अटक आरोपींना मंगरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उप-विभागीय पोलीस अधिकारी जितेन्द्र जाधव यांच्या मार्गदर्शनात मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांच्या नेतृत्वातील पोलीस अंमलदार अवधुत शेलोकार, मोसीन शहा, निशांत शेंडे, अमोल हिवराळे, अतुल पाटील, सुधिर मेश्राम, प्रफुल्ल माळोदे यांचे पथकाने ही कारवाई केली.