अमरावती : राज्यातील १३८ तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती होणार आहेत. यापैकी ७८ नगरपंचायतींसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. यात जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुका मुख्यालयाचा समावेश आहे. शासनाने ३० जून २०१४ पर्यंत याविषयी हरकती व आक्षेप मागविले होते. परंतु यावर आक्षेप आलेच नाहीत. तसेच ग्रामसभा व मासिक सभांचे अहवालदेखील सकारात्मक आल्याने विना अडसर येथे नगरपंचायती होणार आहेत. जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतींची लोकसंख्या २५ हजारांच्या आत असल्याने या ठिकाणी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. १ मार्च २०१४ रोजी राजपत्रात याविषयीची अधिसूचना जारी करून ३० जूनपर्यंत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. तसेच स्थानिक ग्रामसभा व ग्रामपंचायतींच्या मासिक सभांचे सकारात्मक अहवालही मागविले होते. हे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परंतु चारही तालुक्यांत आक्षेप व हरकती आल्याच नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरीय सुनावणी होणार नसून याविषयीचे अहवाल याच आठवड्याला नगरविकास प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. चारही ठिकाणी आक्षेप नसल्यामुळे येथे विना अडसर नगरपंचायती स्थापित होणार आहेत.
विना अडसर होणार चार नगरपंचायती
By admin | Published: July 02, 2014 11:08 PM