अमरावती : वडाळी, पोहरा जंगलात १८ ते २० बिबट्यांची संख्या असून दोन बिबट मादीने चार छाव्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे हे जंगल वन्यपशुंसाठी पोषक ठरु लागले आहे. यापूर्वी जंगलातील पट्टेदार वाघ देखील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे, हे विशेष.अभयारण्याचा दर्जा मिळण्यासाठी वडाळी-पोहरा हे जंगल स्पर्धेत आहे. मात्र, शासनाने या जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला नसला तरी बिबट्यांची वाढलेली संख्या, पट्टेदार वाघाच्या अस्तित्वामुळे या जंगलाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपासून विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर जाणवतो आहे. जेवडनगर ते छत्री तलाव तसेच परसोडा भागात दोन बिबट मादीसोबत चार बछडे असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरणअमरावती : या बिबट मादीला परिसरात शिकार करण्याची संधी असल्यामुळे ते काही दिवसांपासून याच भागात वास्तव्यास आहेत. छत्रीतलाव ते जेवड भागात मोकाट गावठी कुत्र्यांचा वावर असल्याने बिबट कुत्र्यांची शिकार करुन पोट भरतात, असा निष्कर्ष वनाधिकाऱ्यांनी लावला आहे. विद्यापीठ परिसरात काही दिवसांपासून एका बिबट्याचे कायम वास्तव्य आहे. वडाळी-पोहरा या विस्तीर्ण जंगलात यापूर्वी १८ ते २० बिबट्यांची संख्या गृहित धरण्यात आली असताना आता त्यात चार नवीन छाव्यांचीही भर पडली आहे. हे दोन छावे मादी बिबटसोबत छत्रीतलाव ते जेवड भागात वास्तव्यास असल्याचे अनेक नागरिकांनी बघितले आहे. वडाळी-पोहरा जंगलात बिबट्यांची संख्या वाढली असली तरी एकाही बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आलेली नाही. त्यामुळे जंगलात बिबट्यासह हरीण, निलगाय अन्य वन्यप्राणी सुखरूप असल्याचे दिसून येते.या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचारवडाळी-पोहरा जंगलात बिबट मोठ्या संख्येने असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यात चिरोडी, पोहरा, भानखेड, मालखेड, बोडना, पिंपळखुटा, इंदला, मार्डी, चिरोडी, अंजनगाव बारी, कोंडेश्वर, गोंविदपूर या गावांचा समावेश आहे. या गावांच्या जंगल परिसरात बिबट्यांचे अस्तित्व आहे. भानखेडा मार्गावर एका बिबट्याचे कायम वास्तव्य आहे.
वडाळी, पोहरा जंगलात चार नवीन छाव्यांची भर
By admin | Published: November 25, 2015 12:44 AM