वरूड : सहकार क्षेत्रात वरुड तालुका अग्रेसर असल्याने नागरी, बिगर शेती आणि कर्मचारी पतसंस्थांची संख्या येथे तब्बल ५५ आहे. यातील नागरी पतसंस्थापैकी चार पतसंस्था अवसायानात निघाल्याने ठेवीदारांच्या लाखो रुपयाच्या ठेवी अडकल्या आहेत. काही पतसंस्था आॅक्सिजनवर असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. यामुळे ठेवीदारांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ठेवीदारांनी सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. मात्र, अद्यापही ठेवी मिळाल्या नाहीत, ही शोकांतिका आहे. सहकाराचा स्वाहाकार होत असताना असताना सहकार खाते मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुका सुखी आणि समृध्द तालुका म्हणून गणला जातो. येथे बागायतदारांची संख्या अधिक असल्याने हा भाग असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणू नावारूपास आला आहे. यामुळेच येथे नोंदणीकृत पतसंस्थांमध्ये २० कर्मचारी पतसंस्था, ११ बिगर शेती ग्रामीण पतसंस्था, २४ नागरी पतसंस्था आहे. पगारदार सभासदांच्या कर्मचारी पतसंस्था सुरळीत सुरु आहेत. तर बिगरशेती पतसंस्था व्यावसायिकांना कर्ज देत असल्याने त्या काहीशा सुस्थितीत आहे. मात्र, नागरी पतसंस्थामध्ये शेंदूरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी पतसंस्था, समृध्दी नागरीक पतसंस्था, गाडगेबाबा नागरी सहकारी पतसंस्था तर वरुड येथील अर्बन क्रेडीट को-आॅप सोसायटी यांचा समावेश आहे. यामध्य ेलोकसेवा नागरी पतसंस्थेत १० लाख ८४ हजार रुपये ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, समृध्दी नागरी पतसंस्थेत १७ लाख ३३ हजार रुपयांच्या ठेवी आणि तेवढीच कर्जवसुली, गाडगेबाबा नागरी पतसंस्थेतून ठेवी किंवा कर्जवसुली नाही. तर वरूडच्या अर्बन क्रेडीट को-आॅप. सोसायटीमध्ये ठेविदारांचे १३ लाख ३३ हजार रूपये असून तेवढीच कर्जवसुली असल्याने ठेवीदारांच्या मुदती ठेवी अडकल्या आहेत. काही नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये जेमतेम कारभार सुरु असून त्या आॅक्सिजनवर आहेत. हितसंबंध जोपासणाऱ्या ठेविदारांना किस्तीने ठेवी परत करणे सुरू असले तरी गरजू ठेविदारांना रक्कम मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एका ठेविदाराने पतसंस्थेला याबाबत नोटीस दिली असता हा प्रकार उघडकीस आला. संस्थेत चकरा मारुनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पतसंस्थांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने ठेवीदार आणि खातेदारमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार बिघडले आहेत.
वरुड तालुक्यातील चार पतसंस्था अवसायनात
By admin | Published: September 03, 2015 12:10 AM