अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील मासोद मार्गावरील पिंप्री शेतशिवारात एका ५० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी मृतक महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तथा चार संशयितांना अटक केली. तिला डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली.
तक्रारीनुसार, मीरा ऊर्फ मुन्नी दहीकर (वय ५०, पिंप्री) असे मृत महिलेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी गावातीलच नासिर खान याला मीराचे पती गुंथू दहीकर यांनी बैलाचा व्यवसाय करण्यासाठी पैसे दिले होते. दरम्यान, गुंथू दहीकर यांचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे काही दिवसांनी मीराने नासिर खान यांना रक्कम परत मागितली. त्यावरून वाददेखील झाला. दरम्यान, ४ ऑक्टोबरला शाहरुख खान नासिरखान, सलमान खान नासिर खान, रशीदखान नासिर खान व बाल्या भिसे यांनी मीरा दहीकर हिचे घर गाठले. वीजदिवे फोडले, फाशी देऊन मारून टाकू, अशी धमकी त्यांनी आपल्या आईला दिल्याची तक्रार मिरा यांच्या मुलीने नोंदविली. आपल्या आईचा खून त्या चाैघांनी केला असावा, अशी शक्यता तिने तक्रारीत नोंदविली.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, एसडीपीओ पोपटराव आबदागिरे यांनी भेट दिली. चांदूरबाजारचे ठाणेदार सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहीरकर, उपनिरिक्षक वैभव चव्हाण, आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शाहरुख खान नासिरखान, सलमान खान नासिरखान, रशीद खान नासिर खान व बाल्या भिसे या चौघांविरुद्ध खून व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली.