वरूड (अमरावती) : नजीकच्या धनोडी येथे राहत्या घरी दोन भावंडं खेळत असताना चार वर्षे वयाच्या शिवाचा पतंगाच्या नादात घराच्या आवारातीलच विहिरीत पडून बळी गेला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. दुपारी ३ वाजता मृतदेह विहिरीतून काढण्यास पोलिस आणि नागरिकांना यश आले.
प्राप्त माहितीनुसार, शिवा ऊर्फ शिवांश सुमित मानकर (४, रा. आंबेडकरनगर, धनोडी) असे मृताचे नाव आहे. तो चुलत भावासमवेत आवारात खेळत होता. यादरम्यान एक पतंग घरातील विहीर झाकण्यासाठी ठेवलेल्या टिनपत्र्यावर पडला. तो पतंग काढण्याकरिता शिवा पत्र्यावर गेला आणि त्यासह विहिरीत कोसळला. त्याच्यासोबत खेळत असलेल्या चुलतभावाने लगोलग शिवा विहिरीत कोसळल्याची माहिती घरातील लोकांना दिली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.
दुपारी ३ च्या सुमारास शिवाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांची येथे एकच गर्दी होती. शेंदूरजनाघाट पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळेंसह शेंदूरजनाघाट पोलिस करीत आहेत.
विहिरीचा उपसा करून काढला मृतदेह
विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शिवा थेट पाण्यात बुडाला. कुटुंबीयांची धावपळ सुरू असतानाच शेंदूरजनाघाट पोलिस पथक ठाणेदार सतीश इंगळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर विहिरीतील पाण्याचा अतिरिक्त १० अश्वशक्तीचा पंप लावून उपसा करण्यात आला. अखेरीस चार तासानंतर दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर दृष्टीस पडला.
आई-वडिलांचा एकुलता एक
एकुलत्या एक मुलाचा अचानक विहिरीत पडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह मानकर कुटुंबातील सर्वच धाय मोकलून रडत होते. शिवा विहिरीत कोसळल्यानंतर लगोलग काका गौरवने विहिरीत उतरून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. या धावपळीत गौरवच्या हातालासुद्धा लागल्याने तो जखमी झाला.