अमरावती : प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने शिरजगाव कोरडे येथील ४७ वर्षीय आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व एक हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २ जुलै रोजी स्थानिक न्यायालयाने हा निर्णय दिला. श्रीकृष्ण माणिकराव शेंडे, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दोषारोपपत्रानुसार, १५ एप्रिल २०१५ रोजी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान शिरजगाव कोरडे येथे बस स्थानकाजवळ केवल चौदास भोसले हा त्याच्या मुलीसोबत उभा होता. याचवेळी आरोपी श्रीकृष्ण हा चांदूर रेल्वे रोडच्या दिशेने आला व केवल याच्यावर चाकूने वार केले. तेव्हा केवल घटनास्थळावरून स्वत:ला वाचविण्यासाठी पळाला. परत आरोपीने त्याच्यावर वार केला. त्यानंतर त्याला त्याची सासू, पत्नी व साळ्याने चांदूर रेल्वे येथे भरती केले व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दाखल करू त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमी केवल हा त्यावेळेस रिपोर्ट देण्याच्या परिस्थितीत नसल्याने त्याचा साळा आदेश मंचित पवार याच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस ठाणे चांदूर रेल्वे येथे आरोपीविरुध्द भा.दं.वि चे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा जखमी केवल चौदास भोसले हा एकमेव साक्षीदार होता. सदर प्रकरणाचा तपास चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील एपीआय महेंद्र अंभोरे व सुधाकर चव्हाण यांनी केला. या प्रकरणात आरोपी विरुध्द कलम ३०७ भा.दं.वि. कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश व्ही. एस. गायके यांनी आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व रुपये १००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी यशस्वतीरीत्या युक्तिवाद केला व पैरवी अधिकारी म्हणून एएसआय सी. एम. यादव यांनी काम पाहिले.