अध्यादेश जारी : पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याचे यश, पेढी प्रकल्पबाधितांमध्ये हर्षअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अन्य प्रकल्पबाधितांना यापुढे त्यांच्या जमिनीचा चौपट मोबदला मिळाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून दोनच्या गुणकाबाबत राज्य शासनाने २४ एप्रिल रोजी याबाबत अध्यादेश जारी केला आहे. प्रकल्पबाधितांना दोनच्या गुणकाने आर्थिक मोबदला मिळावा, यासाठी पेढी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्यालाही या अध्यादेशाने यश आले आहे. पालकमंत्र्यांच्या यशस्वी पुढाकाराने राज्य सरकारने चौपट मोबदल्याचा गुणक लावण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला. त्यासाठी पेढी प्रकल्पबाधितांनी पालक मंत्र्यांचे आभार मानले आहेत.शेत जमिनी अधीग्रहीत करताना बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जिल्हावासीयांना कमी मोबदला मिळत होता. या अन्यायाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आता शेतकऱ्यांना दोनचा गुणक लागू झाला आहे. तसे राजपत्र महाराष्ट्र शासनाने २४ एप्रिल २०१७ रोजी निर्गमित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा चौप्पट मोबदला मिळणार आहे. अमरावतीसाठी हा निर्णय झाला असला तरी राजपत्रात नमूद असल्याप्रमाणे राज्यात जेथे जेथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ तरतुदीनुसार प्रादेशिक आराखडा मंजूर आह. तेथील कृषी व ना विकास क्षेत्रातील जमिनीचे अधीग्रहण झाल्यास तेथेही २ चाच गुणक लागू होईल. मोबदला देतांना यापूर्वी अशी सुसूत्रता नव्हती. परंतु आता २४ एप्रिलच्या राजपत्रानुसार कृषी व ना विकास क्षेत्रातील जमिनीचे अधीग्रहण झाल्यास तेथे सारखाच मोबदला जमीन मालकांना मिळेल. अळणगाव येथील पेढी प्रकल्प बाधितांसह अन्य बाधितांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे कैफियत मांडली होती. मंत्रालयात ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व वन विभाग मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वनविभगाचे प्रधान सचिव विकास खारगे संबंधित खात्यांचे अधिकारी व भातकुली तालुक्यातील पेढीबाधित शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी २ हा गुणक लागू करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ चा गुणक लागू होऊन जमीन अधिग्रहणाचा चौपट मोबदला मिळणार आहे. (प्रतिनिधी)‘त्यांना’ मिळणार लाभ १ जानेवारी २०१४ नंतर अधिग्रहित करण्यात आलेल्या भूसंपादनासंदर्भात नव्याने काढण्यात आलेल्या अध्यादेशातील तरतुदी लाभदायी ठरणार आहेत. अर्थात संबंधित भूधारकांना तिप्पटऐवजी चौपट मोबदला मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या नव्या अध्यादेशाचा सर्वाधिक लाभ भातकुली तालुक्यातील अळणगाव, कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण, निंभा, हातुर्णा आणि सातुर्णा या पेढी प्रकल्पबाधितांना मिळणार असल्याने पेढी संघर्ष समितीचे संयोजक विजय दुर्गे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. याबाबत पेढी बाधितांनी पत्रपरिषद घेऊन अध्यादेश आणि त्यामागील भूमिका स्पष्ट केली.पत्रपरिषदेला श्रीकांत राठी यांच्यासह साहेबराव विधळे, अविनाश संके, नरेंद्र वानखडे आदी उपस्थित होते.
जमीन अधिग्रहणाचा चौपट आर्थिक मोबदला
By admin | Published: May 01, 2017 12:06 AM