अमरावती : सोन्याची बोरमाळ परत न देता सराफा व्यावसायिक विजय लक्ष्मणराव खडेकर (४५, सराफा बाजार) याने आपली सुमारे १.४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. त्याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी १३ जून रोजी खडेकर ज्वेलर्सच्या विजय खडेकरविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारकत्या महिलेने खडेकर ज्वेलर्सचे मालक विजय खडेकर यांच्याकडे स्वत:कडील २७.६०० ग्रॅम वजनाचे जुने मंगळसुत्र दुरुस्तीसाठी नेले होते. मात्र ते दुरुस्त होत नाही, असे खडेकर याने सांगितले. त्यामुळे त्यातून दोन ग्रॅमचे डोरले व बाकीमध्ये सोन्याची बोरमाळ बनवून द्या, असे महिलेने सांगितले. त्यानुसार गतवर्षी नोव्हेंबरमध्ये आरोपी खडेकरने २.३७० ग्रॅम वजनाचे डोरले महिलेच्या घरी आणून दिले. मात्र, सोन्याची बोरमाळ आणून दिली नाही. महिलेने वारंवार फोन करुन उर्वरित सोन्याची बोरमाळ करुन देण्याबाबत विनंती केली. परंतु आरोपीने टाळाटाळ केली.
जे होते ते करून घ्या
आरोपीने महिलेच्या मुलीच्या मोबाईलवर ‘माझ्या जवळ पैसे नाही. तुमच्या सोन्याची बोरमाळ बनवून देऊ शकत नाही. तुमच्याकडून जे होते ते करुन घ्या, पोलिसांना रिपोर्ट करुन द्या, अशी धमकीचा संदेश पाठिवला. त्यामुळे सात महिन्यानंतर या प्रकरणात आरोपी विजय खडेकरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.